महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम दर्जाहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:51 AM2018-06-15T00:51:00+5:302018-06-15T00:51:00+5:30
मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या केळझर- दाबगाव मक्ता मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाकरिता डांबरीकरणाच्या बाजूला सुलूप भराई सुरु आहे. मात्र त्यात गैरव्यवहार होत असून अभियंता व कंत्राटदाराकडून शासन आणि जनतेची दिशाभूल होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुशी (दाबगाव) : मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या केळझर- दाबगाव मक्ता मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाकरिता डांबरीकरणाच्या बाजूला सुलूप भराई सुरु आहे. मात्र त्यात गैरव्यवहार होत असून अभियंता व कंत्राटदाराकडून शासन आणि जनतेची दिशाभूल होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
चंद्रपूर- पोंभुर्णा मार्गावरील केळझर ते दाबगाव मक्ता या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. जागोजागी मार्गक्रमणामुळे खड्डे निर्माण झालेले होते. त्यामुळे वाहनधारकांना प्रवासादरम्यान अतिशय त्रास सहन करावा लागत होता. परिणामी खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटनाही घडलेल्या होत्या. यावर उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली. वृत्तपत्रातूनही याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे संबंधित विभागामार्फत सदर मार्गाच्या कामाचे प्रस्ताव बनवून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत काम मंजूर करण्यात आले. या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. कासवगतीने का होईना सदर मार्गाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र त्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून अल्पावधीतच उखडण्याची दाट शक्यता आहे.
केळझर - दाबगाव मक्ता हा मार्ग चंद्रपूर जिल्हास्थळी जाणारा असून अतिशय कमी किमीचा आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षणाच्या व शासकीय कामकाजाच्या दृष्टीने नागरिकांना नेहमीच जिल्ह्याला जावे लागते. तसेच सुशी, जाम तुकूम, जामखुर्द, देवाडा, थेरगाव, वेळवा आदी गावातील रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर रेतीची जड वाहतूकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होते.
याशिवाय पिंपळझोरा (झोपला मारोती) देवस्थान हे पर्यटनस्थळही याच मार्गावर असल्याने भाविक व पर्यटकांची नेहमीच वर्दळही असते. त्यामुळे ये-जा करणाºया वाहनांना वाहतुकीच्या वेळी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून याच रस्त्यालगत रुंदीकरणाच्या हेतुने सुलूप भराईचे काम चालू आहे. मात्र त्यातही मोठा गैरव्यवहार होत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरील सुलूप भराई म्हणजे गैरप्रकारावर केलेली मलमपट्टी, असाच प्रकार आढळून येत आहे. एकंदरीत काम निकृष्ठ होत असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराकडून मनमानी केली जात आहे, असा आरोपही नागरिकांत केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची योग्य चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी व दर्जेदार काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
गांभीर्याने लक्ष हवे
नागरिकांना प्रवास करताना अपघातात नाहक बळी जाऊ नये म्हणून शासनस्तरावरुन रस्त्याच्या बांधकामासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. महागाईच्या काळानुसार रस्त्याच्या कामाची किंमत वाढून निधीतही वाढ होत आहे. मात्र रस्त्याची गुणवत्ता न वाढता आधीच्या तुलनेत कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकात संभ्रम निर्माण होत असून त्यावर ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.