विनापरवानगी वर्गणी गोळा केल्यास तीन महिन्यांपर्यंत करावासासोबत दंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:01 PM2024-09-02T13:01:50+5:302024-09-02T13:03:39+5:30

Chandrapur : गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे करावा लागणार अर्ज

Imprisonment if you collect subscriptions without permission! Punishment with fine which may extend to three months | विनापरवानगी वर्गणी गोळा केल्यास तीन महिन्यांपर्यंत करावासासोबत दंडाची शिक्षा

Imprisonment if you collect subscriptions without permission! Punishment with fine which may extend to three months

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
जिल्ह्यातील गणेश मंडळांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाकरिता वर्गणी गोळा केली जाते. मात्र वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. असे न करता वर्गणी गोळा केल्यास तीन महिन्यांपर्यंत साधा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. शिक्षा टाळण्यासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे.


वर्गणीमध्ये रोख रक्कम किंवा वस्तूंच्या स्वरूपात कोणताही पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा करण्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१- क नुसार सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे.


आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांच्याकडून ऑनलाइन परवानगी, प्रमाणपत्र देण्यात येते. जिल्ह्यातील सर्व लहान, मोठ्या मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केले आहे. 


अर्जासोबत दाखल करावयाची कागदपत्रे 
अर्ज करावा, मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या ठरावाची प्रत, सर्व सदस्यांचे ओळखपत्र, जागेबाबत जमीन मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र, नगरसेवक, सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शिफारसपत्र, विद्युत बिलाची प्रत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, मागील वर्षीचे परवानगीची प्रत, मागील वर्षाच्या-जमा खर्चाचा हिशेब.


अशी होणार कारवाई 
कलम ४१ 'क'च्या तरतुदींचे उल्लंघन करून, सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची परवानगी न घेता पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास आणि तसा दोष सिद्ध झाल्यास, तीन महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलित रकमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होईल.
 

Web Title: Imprisonment if you collect subscriptions without permission! Punishment with fine which may extend to three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.