आम्हच्या वाट्याचे अन्नधान्य गरीबांना द्या; बल्लारपुरात अन्नधान्य योजनेतून 'ते' पडले बाहेर
By साईनाथ कुचनकार | Published: September 7, 2022 04:46 PM2022-09-07T16:46:20+5:302022-09-07T16:56:11+5:30
चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडले आहेत.
चंद्रपूर :अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशनवर धान्य दिले जाते. मात्र अनेकवेळा गरज नसतानाही लाभार्थी धान्य उचलतात. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज असते. अशा लाभार्थ्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज नाही, अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन अन्नधान्य पुरवठा विभागाने केले होते.
या आवाहनानंतर चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने या योजनेतून बाहेर पडले आहेत.
यासंदर्भातील अर्ज त्यांनी तहसीलदार डाॅ. कांचन जगताप, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्याकडे सुपूर्द केला. यांच्यासह अन्य नागरिकांनी योजनेतून बाहेर पडण्याची आवाहन करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने केलेल्या आवाहनानुसार दहेली येथील विलास बोबडे दहेली, बल्लारपूर रतन सिंग बुंदेल यांनी स्वमर्जीने योजनेतून बाहेर पडत आपल्या वाट्यातील धान्य गरजू लाभार्थ्यांना देण्याची विनंती केली आहे.
गरज नसेल तर योजना सोडावी
ज्या नागरिकांना स्वस्त धान्य नको आहे, अशा नागरिकांनी पुरवठा विभागाकडे किंवा रेशन दुकानदारांकडे अर्ज भरून रेशनवरील धान्य नाकारता येते. यामुळे समाजातील गरिब तसेच गरजु नागरिकांना हे धान्य देता येणार आहे. अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
रेशन दुकानात करा अर्ज
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य दिल्या जाते. कोरोना संकटापासून गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरण केल्या जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना धान्याची खरोखर गरज
नाही. त्या लाभार्थ्यांनी रेशनवरील मिळणारे धान्य नाकारले पाहिजे. यामुळे गरीब तसेच गरजूंना लाभ मिळू शकतो. यासाठी संबंधित रेशन दुकानदार, पुरवठा विभागाकडे अर्ज करावा लागतो.
अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेद्वारे ज्या नागरिकांना अन्नधान्याची गरज नाही. अशा नागरिकांनी रेशनवरील धान्य उचलू नये, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे,ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, उदरनिर्वाह करणे कठीण आहे, अशांना रेशनवरील धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या नागरिकांनी हे धान्य नाकारले पाहिजे.
- डाॅ. कांचन जगताप, तहसीलदार, बल्लारपूर