मृत्यूनंतरही ते पाहणार जग; सहा जणांचे नेत्रदान, १२ जणांच्या आयुष्यात येणार उजेड
By परिमल डोहणे | Published: January 29, 2024 05:41 PM2024-01-29T17:41:43+5:302024-01-29T17:42:57+5:30
यातून जवळपास १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.
चंद्रपूर : ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ या पंक्तीप्रमाणे दृष्टी असणाऱ्यालाच हे सुंदर जग बघता येते. मात्र, ज्यांना डोळे नाहीत, अशा व्यक्तींना आपण दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याच्या दृष्टीने मागील वर्षभरात चंद्रपुरात तब्बल सहा जणांनी नेत्रदान केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमूने पाच जणांच्या घरी सहा तासांच्या आत जाऊन, तर एकाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच नातेवाइकांच्या संमतीने डोळे काढले आहेत. यातून जवळपास १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.
एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. त्यामुळे नेत्रदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, याबाबत आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करणारे बरेच असतात. मात्र, प्रत्यक्षात नेत्रदानासाठी नातेवाइकांची संमती फारशी मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सन २०२३ मध्ये सहा जणांचे डोळे व बुबुळ काढण्यात आले आहेत. हे डोळे दृष्टिहीनांवर प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.
कोट
आमच्या विभागातर्फे नेत्रदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी त्याच्या इच्छेचा आदर ठेवून नेत्रदानाकरिता सहमती दर्शविल्यास सहा तासांच्या आत त्याचे डोळे काढण्यात येतात. सन २०२३ मध्ये सहा जणांचे डोळे काढण्यात आले आहेत. त्यातून १२ जणांना नवी दृष्टी मिळणार आहे. -मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
नेत्रदान कोणी करू नये
नेत्रदान हे जरी चांगले असले तरी सगळ्याच व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाहीत, तसेच रेबीज, सिफिल्स, सांसर्गिक कावीळ, सेप्टिसेमिया आणि एड्स, अशा रोगाने बाधित असणाऱ्यांना डोळे दान करता येत नाहीत.