चंद्रपुरात आता रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मिळणार पास, गर्दी टाळण्याकरिता प्रशासनाचा निर्णय
By साईनाथ कुचनकार | Published: September 29, 2023 03:21 PM2023-09-29T15:21:47+5:302023-09-29T15:22:32+5:30
या पासमुळे रुग्णालयातील अन्य गर्दीवर नियंत्रण मिळविता येणार असून अन्य नागरिकांची गर्दी टाळता येणार आहे
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय), मध्ये रुग्ण दाखल होताना रुग्णासोबत अनेक नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. परिणामी येथील रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी आता रुग्णालय प्रशासनाने कडक पाऊल उचलणे सुरू केले आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून रुग्णालयात रुग्णाला दाखल करताना त्याच्यासह एका नातेवाईकाला पास दिला जाणार आहे. या पासमुळे रुग्णालयातील अन्य गर्दीवर नियंत्रण मिळविता येणार असून अन्य नागरिकांची गर्दी टाळता येणार आहे.
या पासच्या आधारावर रुग्णांच्या नातेवाइकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या पाससोबतच रुग्णाला भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. नागरिकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, विनाकारण रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी केले आहे.