कर्नाटका एम्प्टा प्रकरणात खासदार धानोरकरांच्या बंधुसह नऊ जणांवर रात्री गुन्हे दाखल
By राजेश भोजेकर | Published: June 20, 2024 12:46 PM2024-06-20T12:46:45+5:302024-06-20T12:48:40+5:30
भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आंदोलनकारी केपीसीएल अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आंदोलनकर्ता निलेश भालेराव याने केपीसीएल अभियंता शिवप्रसाद यांच्या श्रीमुखात हाणली.
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आंदोलनकारी केपीसीएल अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आंदोलनकर्ता निलेश भालेराव याने केपीसीएल अभियंता शिवप्रसाद यांच्या श्रीमुखात हाणली. या प्रकरणी रात्री उशिरा अभियंता शिव प्रसाद यांच्या तक्रारीवरून निलेश भालेराव व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासह नऊ जणांवर शासकीय काम करीत असताना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खाण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
बरांज गावाचे पुनर्वसन करावे व स्थानिकांना रोजगार द्यावा, यासह १६ मागण्यांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बुधवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता बरांज येथील कर्नाटक एम्टा खाण परिसरात आंदोलन सुरू असताना एका आंदोलनकर्त्याने केपीसीएल कंपनी अभियंत्याच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेऊन कोळसा खाणीतील कामकाज आज दिवसभर बंद पाडले.
केपीसीएल कंपनीने कोळसा खाणीसाठी जमीन अधिग्रहित केली. मात्र, बरांज गावाचे पुनर्वसन व स्थानिकांच्या रोजगारासह अन्य १६ मागण्या सोडविल्या नाही. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आमदार व नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे खाण परिसरात आंदोलन केले होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खाण व्यवस्थापनाला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन खाण परिसरात आंदोलन सुरू केले. दरम्यान, कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी पूर्ण न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कर्नाटका एम्टा कंपनीविरोधात नारेबाजी केली. दरम्यान, बाचाबाची होऊन निलेश भालेराव नावाच्या कार्यकर्त्याने केपीसीएलचे मुख्य अभियंता शिवकुमार यांच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
यापूर्वी उद्धवसेना जिल्हाप्रमुखाने केली होती मारहाण
कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाण परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजही तणावपूर्ण वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही खाण व्यवस्थापनाने काहीच हालचाली केल्या नाही. प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कामालीचा रोष आहे. यापूर्वी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनीही मागीलवर्षी २ ऑक्टोबरला कंपनीत एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला असता त्याच्या कुटुंबियांना योग्य मोबदला द्यावा म्हणून आंदोलन केले होते. तेव्हाही मारहाणीचा प्रकार घडला होता. जीवतोडे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हे दाखल झाले होते. असे प्रकार थांबविण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. आंदोलक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे.