बायपास मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास
By Admin | Published: July 29, 2016 01:00 AM2016-07-29T01:00:48+5:302016-07-29T01:00:48+5:30
वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा ...
वाहनधारकांची गैरसोय : टोल टॅक्ससाठी मार्गच केला बंद
वरोरा : वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा टोल टॅक्स चुकू नये म्हणून सहारा पार्क ते शहरात जाणारा वणी बायबास रोड रेल्वे फाटक बंद करुन गेल्या काही वर्षापासून कायमच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे याच मार्गावरील रेल्वे गेटच्या बंद फाटकासमोर मात्र एसटी बसचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा वणी बायपास स्टॉप म्हणून थांबासुद्धा आहेत. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा समूह, कर्मचारी वृंद आणि स्त्री-पुरुष प्रवासी दर दिवशी येथे प्रवासी वाहनातून चढ- उतार करीत असतात. असे करताना सर्वानाच दररोज धोका पत्करून रेल्वे रुळ ओलांडावा लागत आहे. सदर थांबा प्रवाशांना सोयीचा व जवळचा असल्याने, वेळ आणि रिक्षा भाडे यात बचत होत असल्याने हा वणी बायपास बंद असूनही तिथे वर्दळ सुरूच आहे.
एक तर नियमानुसार रेल्वे रुळ ओलांडता येत नाही. मात्र सोयीचा व जवळचा असल्याने हा नियम तोडण्याचा मोह नागरिकांना सोडता येत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे अपघात घडून या ठिकाणी लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. तरीही सदर बायपास वापरण्यातच येत आहे. जीवावर उदार होवून हा खेळ सोयीचा म्हणून चालू आहे. त्यामुळे जनतेची ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने नियोजन करुन प्रवशांच्या सोयीकरिता या समस्येतून त्यांची सुटका करावी व रेल्वे गेटवरुन पादचारी मार्ग म्हणून लोखंडी पूल तरी रेल्वे स्टेशन पुलाच्या धर्तीवर जलद उभारावा, अशी मागणी आहे. यामुळे अपघातही टळतील व गोरगरिबांना विद्यार्थी व कर्मचारी तथा सर्वाच्याच ते सोयीचे होईल.
उल्लेखनीय म्हणजे या सोबतच सदर लोखंडी पुलामुळे विनाकारण बंद असलेला रस्ता खुला होवून वरोरा शहरांचे प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या साईमंगल चौकाच्या सौदर्यात आणखी भर पडून व्यावसायीक व आर्थिक महत्वही वाढेल.(शहर प्रतिनिधी)