हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Published: November 11, 2016 01:03 AM2016-11-11T01:03:11+5:302016-11-11T01:03:11+5:30
स्थानिक वन प्रशिक्षण अकादमी सभागृहात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या ५६ व्या महाराष्ट्र राज्य
५६ व्या राज्य नाट्य स्पर्धा : ‘आडवी बाटली’ नाटकाने स्पर्धेची दमदार सुरूवात
चंद्रपूर : स्थानिक वन प्रशिक्षण अकादमी सभागृहात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या ५६ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ‘आडवी बाटली’, या दोन अंकी नाटकाने मान्यवर रंगकर्मी व २५० प्रेक्षकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाकिारी संजय धिवरे, वन प्रबोधिनी अकादमीचे उपसंचालक धानके, चंद्रपुरातील जेष्ठ नाट्य रंगकर्मी किशोर जामदार व परीक्षक मनोहर धोत्रे, श्याम अधटवार, संदीप देशपांडे व सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाचे खडसे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन व दीप प्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत एक वृक्ष व वृक्षाची माहिती सांगणारी पुस्तिका व डॉ. श्रीराम लागूनी लिहिलेल्या ‘वाचिक अभियनाचे’ पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. संचालन सुशील सहारे यांनी केले. अध्ययन भारती, वर्धा या संस्थेमार्फत सादर झालेले नाटक ‘आडवी बाटली’मध्ये लेखक व दिग्दर्शक हरीश ईथापे यांनी दारूबंदीचा विषय घेऊन व्यसनाधीन झालेला समाज या विषयावर प्रकाश टाकला आहे.
नवरा बायकोच्या नात्यांमध्ये दारूच्या व्यसनामुळे संसार उद्धवस्त होतो. तसेच बाप लेक कसे दारूच्या आजारी जाऊन घरचे दागिने विकण्यापर्यंत व त्यासाठी त्यांना मारहाण करणे अशाच प्रसंगातून गावातील प्रत्येक कुटुंबातील समस्या मांडली आहे. त्याविरोधात महिला कशा एकत्र येतात व उभी बाटली आडवी करू, असा निर्धार करतात. स्वत:च कुंकु व मंगळसूत्र काढून टाकतात. नवऱ्याविरूद्ध बंड उभारतात, आदी मनोवेधक पद्धतीने साकारण्यात आले. या नाटकात ‘लाईव्ह डफडा’ चा वापर चांगला केला आहे. नाटकाला अनुसरून नेपथ्याचा वापर केला. सध्या हजार व ५०० रुपयांचे बंद झालेले चलन या विषयावरही कलावंतानी नाटकात गमतीदार कोटी करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. दिग्दर्शक स्वत: लेखक असल्यामुळे त्यांनी ते अधिकपणे प्रभावी मांडलेल आहे.
चंद्रपुरात दारूबंदी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तो विषय बघताना त्यांच्या सतत येणाऱ्या हश्या व टाळ्यांवरून प्रेक्षकांना जास्तच भावला, हे दिसत होते. या प्रयोगाने लेखन-दिग्दर्शक हरीश इथापे, संगीत सुहास नगराळे, प्रकाश योजना चैतन्य आटले, नेपथ्य- मंदार घेवारे, वेशभूषा- धनजय परळीकर, रंगभूषा- मीनल इथापे, सहभागी कलावंत अमित मुडे-शंकर, श्वेता क्षिरसागर- पार्वती, रश्मी, खेडकर - बकी, वैष्णवी बोरकर- श्रद्धा, अनुष्का बिंडलकर-मंजूर, विशाखा बिंडलकर - सरजा, राजश्री फरकाडे- प्रणाली, प्रिती मख- समाजसेविका, सागर देवके- उज्वल, मोहिली गोलाईत-कवशी, अशिष गोलाईत- उकड्या निखिल झोडे-सुकळ्या, अमित डांगे-मामा, रूपराव कांबळी- पाटील अमर इमले - सोम्या प्रविण तेलंग- बा. दिलीप चक्रे- डवल्या सुशिल ससाणे- गोदाबाई, सहिता इथपे - गावातली मुलगी, निलेश सोनार- गावकरी यांच्या भूमिका आहेत. (प्रतिनिधी)