धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे उद्घाटन

By admin | Published: October 16, 2016 12:43 AM2016-10-16T00:43:04+5:302016-10-16T00:43:04+5:30

स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला शनिवारी सुरूवात झाली.

Inauguration of Dhammacharak Traffic Festival | धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे उद्घाटन

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे उद्घाटन

Next

बौद्ध अनुयायांचे जत्थे दाखल : बाबासाहेबांना अभिवादन करून मिरवणूक
चंद्रपूर : स्थानिक दीक्षाभूमीवर ६० व्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला शनिवारी सुरूवात झाली. या सोहळ्यासाठी जिल्ह्यात बौद्ध अनुयायांसह विदर्भातूनही जत्थे दीक्षाभूमीवर येत आहेत. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जगात शांतता नांदण्यासाठी बुद्ध विचाराचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी केले.
धम्मसमारंभाचे उद्घाटन आंबोरा येथील भदन्त डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर होते. यावेळी प्रमुख अतिथी मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, अरुणाचल प्रदेशातील भदन्त डॉ. वण्णासामी महाथेरो, संदावरा महाथेरो, उत्तमा महाथेरो, ज्योतिला महाथेरो, तेजानिया महाथेरो, अगासारा महाथेरो, विरिया महाथेरो तसेच त्रिपुरा येथील धम्मनाग थेरो, इंग्लड येथील धम्मघोष मेत्ता थेरो, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश दहेगावकर, मारोतराव खोब्रागडे, अ‍ॅड. राहुल घोटेकर आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने सायंकाळी शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वशांती, बंधुत्व प्रेरीत वाहनांसह दुचाकीवर मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जटपुरा गेटमार्गे दीक्षाभूमीकडे मार्गक्रमण करीत गेली. मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचल्यानंतर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आशुतोष सलील व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत धम्मज्योत प्रज्ज्वलन व सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली.
तत्पूर्वी दीक्षाभूमीवर दुपारपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थे दाखल झाले. त्यांनी दीक्षाभूमीवरील बौद्ध विहारात दर्शन घेतल्यावर परिसरातील स्टॉलची पाहणी केली. ते बुद्ध विहारात दर्शनाला जाण्यासाठी बॅरिकेट्समध्ये रांगेत उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्ध दर्शन घेतले. दीक्षाभूमी परिसरासह आसपासच्या रस्त्यावर बौद्ध अनुयायी पंचशील ध्वज घेऊन घोषणा देताना दिसत होते. (प्रतिनिधी)

अनुप्रवर्तन सोहळ्यात आज
सकाळी १० वाजता : शहराच्या मध्यभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन. त्यानंतर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातू कलशासह समता सैनिक दलाचे पथसंचलन.
दुपारी १.३० वाजता : सामूहिक बुद्धवंदना व धम्मप्रवचन- अध्यक्ष अ. भा. धम्म सेना नायक भदन्त आर्य नार्गाजुन सुरई ससाई, विशेष अतिथी भदन्त प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो, अरूणाचल प्रदेशचे भदन्त डॉ. वण्णासामी महाथेरो, इंग्लड येथील भिक्खु धम्मनाग थेरो, नागपूर येथील भिक्खु धम्मसारथी, भिक्खु बोधीरत्न, भिक्खु नागाघोष, भिक्खु नागाप्रकाश व भिक्खु नागवंश
सायंकाळी ५ वाजता : मुख्य समारंभ, अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, प्रमुख अतिथी अमेरिका येथील होफान अलन सेनाडके, विशेष अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. नाना शामकुळे, अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, पुणे येथील धम्मचारी मैत्रेयनाथ, अमेरिका येथील धम्मचारी वीरधम्म, हंगेरीचञया जयभीम इंटरनॅशनलचे जॅनस आर्सस
रात्री १० वाजता: ‘युगपुरुष’ हा कुणाल वराळे निर्मित बुद्ध-भीम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम.

आर्थिक साक्षरता अभियान
बौद्ध समाजाने सामाजिक चळवळीवरच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे समाजाचे आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष झाले. ही बाब लक्षात घेऊन दीक्षाभूमीवर सोशल एज्युकेशन मुव्हमेंटतर्फे आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
पुस्तकांच्या दुकानांवर गर्दी
नागपूर येथील दीक्षाभूमीवर सर्वाधिक दुकाने पुस्तकांची असतात. तेथे सर्वाधिक विक्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांविषयी पुस्तकांची होत असते. तोच प्रत्यय चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येत आहे. पुस्तकांच्या दुकानांवर सर्वाधिक गर्दी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा आदींच्या विचारांवरही आधारित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Inauguration of Dhammacharak Traffic Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.