पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:45 PM2017-11-08T23:45:47+5:302017-11-08T23:46:09+5:30
तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा दिघोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा दिघोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, गटविकास अधिकारी शशीकांत शिंदे, उपशिक्षणाधिकारी किशोर काळे, दिघोरीच्या सरपंच बयाबाई निमसरकार आदी उपस्थित होते.
दिघोरी शाळा आंनददायी शिक्षण देणारी शाळा असून विविध उपक्रम या शाळेत राबविले जातात. यातुनच खरे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळत असते. शिक्षकांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दिघोरी सारख्या प्रेरणादायी शाळा गावागावात निर्माण करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिक्षकांचे काम कुंभाराप्रमाणे असून विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे. चांगला विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. संगणकामध्ये प्रचंड माहितीची शक्ती असून यामुळे विद्यार्थ्यांना आवड असणारे क्षेत्र निवडण्याची संधी प्राप्त होणार आहे. गाव शाश्वत, स्वच्छ राखण्यासाठी गावातील प्रत्येकांनी स्वच्छतागृही म्हणून काम करावे, असे ते म्हणाले म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ कासर्लावार यांनी तर आभार मुख्याध्यापक सुनील कोहपरे यांनी मानले.
दोन तासांचे शिक्षण
जिल्ह्यातील टाटा ट्रस्टच्या मदतीने चंद्रपूर, जिवती, पोंभुर्णा, मूल, बल्लारपूर व गोंडपिपरी या तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना पालकमंत्री फिरते संगणक शिक्षण शाळेचा फायदा होणार आहे. आठवड्याला दोन तास असे ६० तासांच्या प्रशिक्षणातून शालेय विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान प्राप्त करता येणार आहे.