बल्लारपुरात साकारणार साडेपाचशे कोटींचे महिला विद्यापीठ; ज्ञान संकुलाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 02:18 PM2023-06-12T14:18:33+5:302023-06-12T14:21:04+5:30
विद्यार्थिनींसाठी ज्ञानाची कवाडे खुली
चंद्रपूर : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून बल्लारपूर येथे शनिवारी (दि. १०) राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे लोकार्पण, नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल मुलींची शाळा आणि विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. बल्लारपूर-विसापूर मार्गावर ५० एकर जागेमध्ये ५६० कोटी रुपये खर्च करून अप्रतिम विद्यापीठ साकार करण्यात येणार आहे.
यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अल्का आत्राम, जिल्हाधिकारी विनय गौडा, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरु डॉ. रुबी ओझा, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार कांचन जगताप, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कुलसचिव विलास नांदावडेकर, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. नितीन तेंडुलकर, मुख्याधिकारी विशाल वाघ उपस्थित होते.
ज्ञान संकुलाचे अधिकृत लोकार्पण बल्लारपूर शहराची गुणवंत विद्यार्थिनी आस्था सुरेश उमरे या विद्यार्थिनीच्या हस्ते झाले. दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थी आस्था उमरे, सतीश मिश्रा, प्राची वर्मा, मंथन आवळे, गौरव आकरे, तृप्ती देवगडे, जानवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. रुबी ओझा, संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. कुलसचिव विलास नांदावडेकर यांनी आभार मानले. पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत करार : सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर येथे ११.३० कोटीत स्व. सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू होईल. या केंद्रातून महिलांना कला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित करता येईल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूल येथे महिला महाविद्यालयाला मंजुरी दिली. हे विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत दोन वर्षांत एमओयू करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत न जाता मूलमध्येच महिलांना उत्तम शिक्षण घेता येईल. चंद्रपूर येथे नुकतीच रात्रपाळीच्या महाविद्यालयाला मान्यता आणली. मुलींनी महिला विद्यापीठ केंद्रातील अभ्यासक्रमाची माहिती घेत शिक्षणासाठी यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महर्षी कर्वे यांची स्वप्नपूर्ती : कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव
मुलगी शिक्षणासाठी विद्यापीठापर्यंत येत नसेल तर तिच्यापर्यंत पोहोचणे हे महर्षी कर्वे यांचे स्वप्न होते. १०७ वर्षांपूर्वी म्हणजे १९१६ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून विद्यापीठ सक्षम केले. पहिले कॅम्पस, पुणे येथे त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व आता चंद्रपूरमध्ये ज्ञान संकुल सुरू झाले, अशी माहिती कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.