जागा उपलब्ध होण्यापूर्वीच पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
By Admin | Published: October 5, 2015 01:35 AM2015-10-05T01:35:19+5:302015-10-05T01:35:19+5:30
एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटीच्या घूग्घुस पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन ...
घुग्घुस : एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटीच्या घूग्घुस पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन राज्याचे वर्तमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. अलिकडेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मात्र नुकतेच घुग्घूस ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चंद्रपूर उपविभागाकडून जलशुद्धीकरण सयंत्र बांधकामाकरिता नियोजित भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्यामुळे जागा उपलब्ध करण्यापूर्वीच उद्घाटनाची घाई का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर पाणी पुरवठा योजनेबाबत घुग्घुस ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, हे विशेष.
येथील चौधरी लेआऊटमध्ये जागा अपुरी असताना विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २४ आॅगस्टला खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेच्या जलशुद्धीकरण सयंत्र बांधकामाकरिता पुरेशी जागा उपलब्ध नव्हती, हे त्या विभागाला माहिती होते मात्र तत्कालिन उपसरपंच निरीक्षण तांड्रा व जि.प. विद्यमान बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी नजिकच्या लेआऊटमधील जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष होऊनही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. नियोजित जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे पत्र जीवन प्राधिकरणाच्या चंद्रपूर उपविभागाने नुकतेच ग्रामपंचायतीला पाठविले आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ४ आॅगस्टला झाल्या. या निवडणुकीत भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस बहुमताने विजयी झाली. ७ सप्टेंबरला सरपंचपदाची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांनी १० सप्टेंबरला पदाची सूत्रे हाती घेताच वरील विषयासंदर्भातील पत्र पुष्पा मेश्राम यांच्या हातील पडले, तेव्हा सर्वच पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सचिवाकडे याबाबत चौकशी केली असता सदर योजनेचे कोणतेही दस्तावेज ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसून वरिष्ठ पातळीवरच योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विषयात आता ग्रामपंचायतीचे नवे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)