करवसुलीसाठी बचत गटांना प्रोत्साहनपर बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:48+5:302021-06-06T04:21:48+5:30
शंकरपूर : संपूर्ण देशात कोविड १९ आजारामुळे मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. कोरोनाची दुसरी ...
शंकरपूर : संपूर्ण देशात कोविड १९ आजारामुळे मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. कोरोनाची दुसरी लाटसुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरून शेकडो नागरिक कोरोनाबाधित झाले. ग्रामपंचायतमधील करवसुली आवकसुद्धा बंद असल्याने ग्रामपंचायत डबघाईस येण्याची शक्यता आहे. अशातच कवडशी डाक येथील सरपंच शुभम ठाकरे यांनी एक अफलातून योजना आखली आहे. ज्या बचत गटातील सदस्यांचे कर निरंक असेल,त्या बचत गटांना दोन हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
चिमूर तालुक्यातील कवडशी डाक ग्रामपंचायतील २४ लाखांचा कर मिळतो. गावाचा विकास करण्यासाठी करवसुली होणे आवश्यक आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थ व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिक कर देण्यास टाळाटाळ करीत आहे. वसुली होत नाही. सरपंच शुभम ठाकरे यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळल्यावर त्यांनी गावाचा अभ्यास करून काही योजना अंमलात आणल्या. निधी आणून विकास कामे करण्याचा विचार त्यांच्या मनात फिरू लागल्यावर एक अफलातून योजना समोर आणली.
गावातील प्रत्येक महिला ही कोणत्या तरी बचत गटांशी संलग्नित आहे. तेव्हा प्रत्येक बचत गटातील महिलांनी आपला गृहकर ग्रामपंचायतीला भरणा केल्यास त्या बचत गटांना दोन हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. जेणेकरून गावातील करवसुली पूर्ण होईल. विकासकामे होईल आणि लॉकडाऊनमध्ये १००टक्के करवसुली करणारी कवडशी डाक ग्रामपंचायतीचा नावलौकिक होईल.