कंत्राटी कामगारांचे आता बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:46 PM2018-01-07T23:46:03+5:302018-01-07T23:47:03+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र अद्यापही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कामगारांनी आता आंदोलन आणखी तीव्र ेकेले आहे. ८ जानेवारीपासून प्रहारच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
१३७अन्यायग्रस्त कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची न्यायोचित मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून साखळी उपोषणास सुरुवात केली. यादरम्यान, उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनात्मक उपक्रम राबविले. चार दिवसांपूर्वी एका गरजू रुग्णाला रक्ताची गरज असल्याने उपोषणकर्त्यांनी त्याला रक्तदान करुन आंदोलनादरम्यान सामाजिक बांधिलकीचाही परिचय दिला. शनिवारी जटपुरा गेट ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत झाडू मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यादरम्यान माजी खासदार नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता त्यांनीही कामगारांची मागणी रास्त असल्याचे सांगून प्रशासनास सूचनाही केल्या.
साखळी उपोषणाचा सातवा दिवस सुरू असतानाही रुग्णालय प्रशासनाने कामगारांची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय प्रहार व कामगारांनी घेतजला आहे. ८ जानेवारीपासून प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. त्यांच्यासोबत काही कामगारही असणार आहेत.
महिला काँग्रेस कमिटीचा पाठिंबा
रविवारी महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने उपोषण मंडपाला भेट दिली. या शिष्टमंडळात बल्लारपूरच्या माजी नगराध्यक्ष रजनी हजारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका नंदा अल्लूरवार, सुनिता धोटे व चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अनिता कथडे उपस्थित होत्या. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या आंदोलनाला आपला सक्रीय पाठिंबा दर्शविला.