अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले
By Admin | Published: March 8, 2017 12:40 AM2017-03-08T00:40:18+5:302017-03-08T00:40:18+5:30
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला.
शेतपिकांचे अतोनात नुकसान : वादळामुळे झाडे कोसळली, अनेक गावांतील बत्ती गूल
चंद्रपूर : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. कोठारी, बल्लारपूर, राजुरा येथे गारांच खच पाहायला मिळाले. राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यात अर्धा ते एक तास झालेल्या वादळी पावसाने हरभरा, तूर, लाखोरी, मिरची, मुंग आदी रबी शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावांतील बत्ती गूल झाली.
बल्लारपूरला दोनदा झोडपले
मंगळवारला दुपारी ३ वाजता वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूरकरांची चांगलेच तारांबळ उडाली. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण, दुपारी ११ वाजता प्रखर उन्ह असताना अडीच-तीन वाजताचय सुमारास वातावरणात बदल होऊन ३ वाजता तुरळक पाऊस सुरू झाला. बघता बघता वादळ सुटले आणि पाऊस झाला व गाराही पडल्या. हा वादळी पाऊस व गारांचा मारा बंद झाल्याच्या एक तासानंतर परत ढगांनी गडगडाट सुरु केला व पाऊस सुरु झाला. सोबत गाराही पडू लागल्या. पण, यावेळेला तीव्रता कमी होती. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. उशीरापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. पावसामुळे तालुक्यात मिरची तसेच कापस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
घुग्घुस परिसरात पाऊस
घुग्घुस : मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरात विजेचा लंपडाव सुरू असून मंगळवारी साडेअकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता.
कोठारी परिसरात गारांचा पाऊस
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरात मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत गारांसह वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. ३.३० वाजता वादळासह ५ वाजेपर्यंत गाराचा पाऊस सुरु होता. वादळाने अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले. कोठारी परिसरात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मुंग, उदड,, मिरची पिकासह अनेक पिकांची लागवड झाली असून काहीनी कापनी सुरु केली तर काही कापणीवर येवून आहेत. अशात अवकाळी पाऊस गारासह बरसल्याने शेतपिकाची प्रचंड नासाडी झाली आहे. या नुकसानीची चौकशी करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार यांनी केली आहे. (वार्ताहर)