मूल बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:30+5:302021-02-26T04:40:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मूल : शहरात येणाऱ्या प्रवाशांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मूल येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शहरात येणाऱ्या प्रवाशांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मूल येथे बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर कामाला सुरुवातही झाली. मात्र, तीन वर्षांचा कालावधी झाला तरीही बसस्थानकाचे काम अपूर्ण असून, प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासोबतच शौचालयात वापरण्यासाठीही पाणी नसल्याने गैरसोय होत आहे.
नवीन बसस्थानकात अनेक समस्या असून, त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मूल शहराबरोबरच तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सर्व सोयींनीयुक्त बसस्थानकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येते. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असली तरी प्रवाशांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एकच शौचालय असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यात पाण्याची सोय नसल्याने मुत्रीघरात व शौचालयात पाणी वापरले जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन घाण वास येत आहे. त्यामुळे प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.