नगरपंचायतीच्या दर्जानंतरही नगरवासीयांची गैरसोय
By admin | Published: October 7, 2016 01:05 AM2016-10-07T01:05:20+5:302016-10-07T01:05:20+5:30
स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले
गोंडपिपरी : स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांचा आजवर आठ महिन्याचा कालावधी लोटूनही शहरातील अनेक प्रभागांमध्ये समस्या ‘जैसे थे’च आहेत. नगरपंचायतीचा दर्जा प्राप्तीनंतरही नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आता ऐकावयास मिळत आहे.
पावसाळा ऋतूपूर्वीच येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र काही अवधीतच सफाई कामगारांना बंद करुन तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील अर्धवट सफाई थांबविली. त्यानंतर स्थानिक मानधन तत्वावरील सफाई कामगारांना प्रत्येक प्रभागात सफाईचे काम करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु कमी कामगार असल्याने व नगरसेवकांचे दबावतंत्र यात काही प्रभागात आजवर नाल्यांची सफाईच करण्यात आली नाही. यानंतर पावसाळा ऋतूत प्रभागांच्या अंतर्गत मार्गावर मुरुम टाकण्यासाठीदेखील नगर पंचायतीने आगेकूच केली. पण नगरसेवकांच्या वारंवार हस्तक्षेपाने व दबावतंत्रामुळे कुठे मुरुम पडला तर कुठे मुरुमाची प्रतीक्षाच नगरवासीयांना करावी लागली.
शहराच्या प्रत्येक प्रभागात कच्चे रस्ते असल्याने हे रस्ते आता खड्डेमय झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून पाण्यातून दुर्गंधी येत असते. या प्रकारामुळे बालगोपालांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. अनेक प्रभागाच्या रस्त्यांवरुन पादचारी लोकांनाही धड चालता येत नाही. या होणाऱ्या गैरसोयीबाबत येथील नगरपंचायतीचे युवा पदाधिकारी व मुख्याधिकारी लक्ष देणार काय, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)