सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:51+5:302021-05-29T04:21:51+5:30
राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी भद्रावती : नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे ...
राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी
भद्रावती : नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किशोर हनुमंते यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
राज्यातील नाभिक समाज आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. उत्पन्न आणि इतर कोणतेही साधन नसल्याने संचारबंदी दरम्यान नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. आर्थिक अडचणीला कंटाळून आजवर २७ नाभिक बांधवांनी आत्महत्या केली आहे. सरकारने याची अद्याप कसलीही दखल घेतली नाही.
राज्यातील तमाम सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिक उत्पन्नच नसल्याने आज उपासमारीला सामोर जात आहेत. घरभाडे, दुकान भाडे, विविध बँकांचे कर्ज, कौटुंबीक खर्च आणि वैद्यकीय खर्च यामुळे त्रस्त झाले आहेत. शासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप कसलीच मदत मिळाली नाही.
सलून व्यावसायिकांनी शासनाच्या सर्वच नियमांचे काटेकोर पालन केले आहे. आजवर आमच्या व्यवसायातून कोरोना संसर्गाची एकही घटना घडलेली नाही. व्यवसाय बंद असल्यामुळे विविध ठिकाणी ग्राहकांची गैरसोय झाल्याने सेवा देण्यात जबरदस्ती केली जात आहे. म्हणूनच वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आमच्या सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन व्यवसाय सुरू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर हनुमंते यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.