घरकुल बांधकामांची रक्कम वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:28+5:302021-01-22T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खडसंगी : ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाकरिता मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असल्याने घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्यात यावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाकरिता मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असल्याने घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणी खडसंगीचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राऊत यांनी ग्रामविकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्या वास्तव्यास असून, त्यांना घरकुल बांधकामाकरिता कमी रक्कम दिली जात आहे. ग्रामीण व शहरी असा भेदभाव केला जात असल्याचा आरोप प्रमोद राऊत यांनी केला आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता शहरी भागात २.५० लाख रुपये रक्कम घरकुल बांधकामासाठी शासन स्तरावरुन दिली जात आहे. तर याचवेळी ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी १.५० लाख रुपये रक्कम दिली जात आहे. विटा, रेती, लोहा, सिमेंट व इतर साहित्यांच्या रकमेत अवाढव्य वाढ झाल्याने आता दीड लाखात घर बांधणे अवघड झाले आहे. एकीकडे साहित्य खरेदी करावे की मजुरी, सेन्ट्रिंगचे पैसे मोजावेत, असाही प्रश्न ग्रामीण भागातील घरकुल मिळालेल्या व नव्याने घरकुले आलेल्या लाभार्थ्यांच्या मनात आहे.
त्यामुळे रक्कम देताना ग्रामीण व शहरी अशी विभागणी न करता सरसकट ग्रामीण भागातील नागरिकांनाही २.५० लाख रुपये घरकुलासाठी देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राऊत यांनी ग्रामविकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.