वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ

By Admin | Published: July 12, 2015 01:23 AM2015-07-12T01:23:44+5:302015-07-12T01:23:44+5:30

रान डुक्कर, हरिण, रानगवा, रोही, माकड, वानर तसेच वन्य हत्ती या व अन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची

Increase in compensation for farmers by wildlife | वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ

वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ

googlenewsNext

चंद्रपूर : रान डुक्कर, हरिण, रानगवा, रोही, माकड, वानर तसेच वन्य हत्ती या व अन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम अपुरी असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल जनसामान्यात प्रतिकुल मत निर्माण होत आहे. त्यामुळे सदर रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय वनविभागाने ९ जुलै २०१५ रोजी निर्गमित केला आहे.
महसुल व वनविभागाच्या ५ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयान्वये शेतपिकाचे दोन हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्यास पूर्ण, परंतु किमान ७०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करुन ९ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये शेतपिकाचे नुकसान १० हजार रुपयांपर्यंत झाल्यास पूर्ण परंतु किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतपिकाचे नुकसान दहा हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास पूर्वी आठ हजार रु. अधिक १० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसानीच्या ४० टक्के रक्कम (१८ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत) नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करून शेतपिकाचे नुकसान १० हजारपेक्षा जास्त झाल्यास दहा हजार रुपये अधिक १० हजारच्या वरील नुकसानीच्या ८० टक्के रकम (२५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत) नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस पिकाचे नुकसान झाल्यास पूर्वी ४०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येत होती आता ८०० रु. प्रति मे.टन प्रमाणे २५ हजारच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फळबागांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातसुद्धा भरीव वाढ करण्यात आली आहे. पूर्वी नारळासाठी २४०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करून ४८०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुपारीसाठी देण्यात येणाऱ्या १४०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाईत वाढ करून २८०० रुपये प्रति झाड, कलमी आंब्यासाठी देण्यात येणाऱ्या १८०० रु. प्रति झाड नुकसान भरपाईत वाढ करून ३६०० रु. प्रति झाड, केळीसाठी नुकसान भरपाईत वाढ करून १२० रुपये प्रति झाड देण्याचा निर्णय घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Increase in compensation for farmers by wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.