सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:45 PM2018-11-11T21:45:35+5:302018-11-11T21:45:57+5:30
वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत.
एकीकडे सर्दी, कप व खोकल्याने रुग्ण बेजर झाले आहेत. दुसरीकडे अनेक रुग्ण हे तापाने फणफणावत आहेत. त्या कारणाने या दिवसांची नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज हजारो रुग्ण हे तपासणीसाठी दाखल होत आहेत.
तर प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या आजाराने शेकडो रुग्ण आढळून येत असून, वेळेवर जर उपचार घेतला नाही, तर रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्या कारणाने एकीकडे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. मागी काही दिवसात चंद्रपुरात एक शिक्षिका व एका इंजिनिरअरचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे विषाणूज्य तापाचेसुद्धा रुग्ण आढळून येत असल्याने ताप अंगावर काढू नका, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शिवाय वैद्यकीय उपचार थातूरमातूर असल्याने परिस्थिती दाहक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण शहरामध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. तर ग्रामीण भागातील शासकीय व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने फुल्ल दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा
जिल्हा परिषदमार्फत चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारातून औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. आरोग्य केंद्रात खोकल्यावरील औषध, तापावरील पॅरासिटामोल, अंग दुखण्यावरील डायक्लोफेन्यॉक अशा विविध औषधांची कमतरता आहे. परिणामी डॉक्टरांनाही रुग्णांना कोणती औषध द्यावी, हा प्रश्न पडतो. तर रुग्णांना खासगी भंडारातून औषधांची खरेदी करावी, लागत असल्याने आरोग्य विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.