मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:19 PM2018-04-04T23:19:11+5:302018-04-04T23:19:11+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

Increase in human-wildlife struggle | मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

Next
ठळक मुद्देअहवाल : विकास योजनांमध्ये लोकसहभागाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र, वन्य प्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप, नैसर्गिक हालचाली, आहार तसेच प्रजननामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचे प्रकार न थांबल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढत होत असल्याचे मागील सात वर्षांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर वनवृत्तातील वनक्षेत्र हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या संरक्षीत क्षेत्रालगत येते. या क्षेत्रातील घनदाट वनसंपदा व जैविक विविधता देशभरातील पर्यटक तसेच संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पर्यटकांचे पाऊल आपुसकच ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. सदर क्षेत्रालगतच बरीच गावे आहेत. गुरे चराईसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी बहुतांश नागरिक जंगलावर निर्भर आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात ग्रामस्थांचा वावर वाढला. त्यातून वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली, आहार आणि प्रजननमध्ये व्यत्यय निर्माण होऊन वन्यप्राण्यांकडून गावकरी अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. लोकसंख्या वाढ, वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग, वाढते औद्योगिकरण आणि वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात निर्माण झालेले अडथळे या बाबीही मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा क्षेत्रामध्ये २०११ ते १२ या कालखंडामध्ये मानव व वन्यजीव संघर्षाच्या ५ हजार ३४४ घटना घडल्या होत्या. त्यावेळी वनविभागाने जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्ला प्रकरणात नुकसान झालेल्या नागरिकांना अनुदान देण्यात आले. परिणामी, २०१२-१३ वर्षात ही संख्या ३ हजार ८३ इतकी झाली. २०१३-१४ वर्षात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिवाय, पशुधन व पीक हाणीच्या ४ हजार ६९० घटना घडल्या. दरम्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली. वन विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाने जागृतीची मोहीम गतिमान करून हा कमी झाला नाही. वन विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार ही संख्या ५ हजार १३० पर्यंत पोहोचली. २०१६-१७ हे वर्ष तर वनविभागासह अभ्यासकांसाठीही चिंतेचे ठरले होते. या वर्षामध्ये ७ हजार २४७ घटना घडल्या. वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग टाळणे व वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न होऊनही मानव-वन्यजीव संघर्षाची धग कायम होती. २०१७-१८ या वर्षातही या घटनांची दाहकता कायम असल्याचे अहवालातून दिसून येते. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना प्रभावीपणे राबवूनही मानव- वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकला नाही. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा क्षेत्रातील वनविकास आणि वन्यजीव संरक्षणांसाठी दीर्घकालिन उपाययोजना सुरू आहेत. विकास योजनामध्ये लोकसहभागीही वाढविला जात आहे. मात्र हा संघर्ष कमी न झाला नाही. त्यामुळे योजनेतील त्रुटी शोधून त्या दूर केल्यास मानव आणि वन्यजीव प्राण्यांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलू शकतो, असा आशावाद प्रकल्प क्षेत्रालगतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वन्य व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
विकास योजनांचे करा मूल्यांकन
वन्यप्राण्यांच्या हल्ला प्रकरणात तातडीने अनुदान देण्याची प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या घटली. मात्र मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर पर्याय म्हणून शासनाने अनेक योजना सुरु करूनही मूळ समस्या संपली नाही. त्यामुळे योजनांचे मूल्यांकन करण्याची गरज आहे.

Web Title: Increase in human-wildlife struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.