सिंदेवाही तालुक्यात अवैध रेती उत्खननात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:33 PM2018-01-02T23:33:19+5:302018-01-02T23:34:11+5:30
वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे.
राकेश बोरकुंडवार ।
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशातच चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पाण्याची मोठी समस्या सिंदेवाही तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्या गावात रेतीघाटाचा लिलाव होवून रेती उपसा सुरु आहे, ते थांबवावे अशी गावकºयांकडून मागणी होत आहे. तालुक्यातील रेतीघाट लिलाव करताना प्रशासनाचे काही नियम आहे. सुरुवातीच्या काही दिवसानंतर या नियमांकडे येथील अधिकारी व कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. कमी दिवसात जास्त आर्थिक लाभ मिळावा, यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून यंत्रणेच्या मदतीने रेतीचा वारेमाप उपसा होत आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.
रेती तस्करांमुळे नैसर्गिक खनिज संपतीची सऱ्हा स लूट होत असतानाही कारवाई करण्याऐवजी अभय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने आताच नदीचे पात्र कोरडे पडायला लागले आहे. तर रेतीही कमी पडली असतानाही रात्रंदिवस रेती उपसा केला जात आहे. यामुळे रेतीचे थरच दिसून येत नाही. परिणामी नदी काठावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. ही बाब प्रशासनाला माहिती असतानाही उपाययोजना करण्याऐवजी नियमांना बगल देवून घाटाचा लिलाव केला जातो. मात्र शासनाच्या तिजोरीत अर्धेच आणि कंत्राटदाराला दुप्पट लाभ मिळत असल्याचे दिसून येते.
रेती उपसाचे नियम आहेत. रेती तस्कराकडून जर नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यात येईल. भुगर्भातील जलसाठ्याचा विषय महत्त्वाचा आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल.
- स्वप्नील रावडे, प्रभावी तहसीलदार, सिंदेवाही.