वाहनांची थांबलेली चाके गतिमान होताच अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:00 AM2020-10-20T07:00:00+5:302020-10-20T07:00:09+5:30
Accident Chandrapur News वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने अपघाताची संख्या रोडावली होती. मात्र वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर जिल्हात सुमारे १२२ अपघात झाले आहेत. यामध्ये ५७ जणांचा बळी गेला असून ७१ जण जखमी झाले आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता संपूर्ण वाहतूक बंद होती. परिणामी जिल्ह्यातील अपघात आपोआपच कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात शासनाने लॉकडाऊन हटविले, पुन्हा वाहनाची चाके सुरळीत झाली.
दुचाकी व चारचाकीधारक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेफीकीर वाहन पळवू लागले. परिणामी अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
अपघाताची मुख्य कारणे
वाहतूक विभागाने वाहन चालवतानाची नियमांवली तयार केली आहे. मात्र अनेकजण वाहन नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवतात.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, रात्रीच्या वेळी वाहन चालवणे, वाहनाची गती जास्त असणे.
वाहतूक विभागाकडून वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी जनजागृती सुरु आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.
- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर