शपथपत्राची अंमलबजावणी न केल्याने रुग्ण मृत्यू संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:31+5:302021-05-18T04:29:31+5:30
चंद्रपूर : नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे मृत्यू अधिक आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे अपुरे नियोजन याला कारणीभूत आहे. शासकीय ...
चंद्रपूर : नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे मृत्यू अधिक आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे अपुरे नियोजन याला कारणीभूत आहे. शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा व प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राची अंमलबजावणी न केल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात भरमसाट वाढ होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविलेल्या एका पत्रातून केली आहे.
जिल्ह्यात मेडिकल काॅलेज, शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभावही पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत्यू संख्येला कारणीभूत आहे. शासनाच्या निर्देशामुळे काॅन्ट्रॅक्ट पद्धतीने डाॅक्टर व इतर स्टाफच्या नियुक्तीचे अधिकार असताना नियुक्तीस विलंब, काेरोनामध्ये काम करणाऱ्या स्टाफला वेतन देण्यास नकार. एकूणच अपुऱ्या स्टाफमुळे दररोज २० ते ३० रुग्ण मृत्युमृखी पडत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.
खनिज निधीत भरमसाट पैसा आहे. जिल्हा नियोजन फंडातून ३० टक्के खर्चाचे अधिकार असताना डाॅक्टर व इतर मेडिकल स्टाफची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणांच्या चौकशीची मागणीही नरेश पुगलिया यांनी केली आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करण्याची ताकीद देण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले; परंतु अंमलबजावणी कोण करणार, असा सवाल पुगलिया यांचा आहे. पहिल्या लाटेत २०० वर, तिसऱ्या लाटेत १२५० वर मृत्यूचा आकडा गेला आहे. आतातरी सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व उच्च न्यायालयात शपथपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा त्यांची आहे. म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात २० रुग्ण आढळले आहे. यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर व औषध उपलब्ध करावे, अशी मागणीही करतानाच २० मे रोजी पंतप्रधान देशातील कोरोनाग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.