डिजिटल क्रांतीतून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 12:31 AM2017-04-30T00:31:08+5:302017-04-30T00:31:08+5:30
महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांचे परिपूर्ण डिजिटायजेशन करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे.
सुधीर मुनगंटीवार : डिजिटल शाळा साहित्य वितरण
चंद्रपूर : महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांचे परिपूर्ण डिजिटायजेशन करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे. या निर्णयाने शैक्षणिक डिजिटल क्रांतीला सुरुवात झाली असून शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. जिल्हा परिषद शाळांना नावलौकिक प्राप्त करून द्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
चंद्रपूर येथील चांदा क्लबवर आयोजित डिजिटल शाळा साहित्य वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. तर व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभुषण पाझारे, गोदावरी केंद्रे व अर्चना जीवतोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, राखी कंचलार्वार व अंजली घोटेकर यावेळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रातील शाळा डिजिटल करण्याचा पहिला प्रयोग धुळे जिल्हयात झाला. परंतु संगणक वाटून शाळांचे डिजीटायजेशन पूर्ण होत नाही. शैक्षणिक मानांकनानुसार आवश्यक असणारे साहित्य आज आम्ही ५७१ शाळांना दिले असून टप्प्याटप्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील १५६४ जिल्हा परिषद शाळांना साहित्य देण्यात येणार आहे. यामध्ये संगणक संच, प्रोजेक्टर, स्क्रीन आणि ५ ते बारावीपर्यंत आवश्यक असणारे डिजीटल अभ्यास साहित्य दिले आहे. चंद्रपूर जिल्हा येथेच थांबणार नसून अंबानी ट्रस्टसोबत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबतचा आमचा करार झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रयोगाची दखल घ्यावी इतके गुणवत्तापूर्ण शिक्षण चंद्रपूरच्या जि.प. शाळेत झाले पाहिजे. यावेळी त्यांनी बल्लारपूर येथे सुरू केलेल्या मुलींच्या डिजीटल शाळांचा दाखला दिला. आगामी काळात माझ्या मुलाची अॅडमिशन बल्लारपूर शहरातील डिजिटल शाळेत झाली पाहिजे, अशी मागणी आपल्याकडे होईल, असे शुभचिंतन व्यक्त केले
वित्तमंत्र्यांनी आपल्या जिल्हयात नवीन काय केले आहे, हे पाहण्यासाठी मी येथे आले आहे, असे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. ते कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्याकडे विशेष लक्ष देवून ते काम पूर्ण करीत असतात. तसेच जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला गॅस योजना, डिजीटल शाळा यासारख्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्राम विकास विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या योजनांचासुध्दा महिला बचत गटांनी व ग्राम पंचायतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाध्येच ५७१ शाळांना संगणक संच, प्रोजेक्टर, स्क्रीन हे साहित्य वाटप करण्यात आले. तर जिल्हयात हागणदारी मुक्त झालेल्या पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)