ग्रामीण भागातील दुकानाच्या वेळा वाढवाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:17+5:302021-07-09T04:19:17+5:30
पर्यटन केंद्रावर बंदोबस्त ठेवावा चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यंटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ...
पर्यटन केंद्रावर बंदोबस्त ठेवावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यंटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जात असतात. परंतु, अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पाणी संचय करण्याची गरज
चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तरीसुद्धा रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.
मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी
चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोअरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोअरमध्ये नोकिया, लेनेव्हो आदी मोबाइलचेही स्टोअर असल्याने त्या कंपनीचे ग्राहकसुद्धा गर्दी करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एक एमआय स्टोअर देण्यात यावे, अशी मागणी मोबाइल ग्राहकांकडून होत आहे.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांस अडचण
चंद्रपूर : ज्या विद्यार्थ्यांना पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये जाण्याची इच्छा असते अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होत असतात. काही जण आठवीपासूनच तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करत असतात. मात्र कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयांत एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे
चंद्रपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. परंतु, ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देत असतात. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहितीही घेत नाही. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
एक खिडकी योजना राबवावी
चंद्रपूर : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एक खिडकी योजना राबवून शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबवली होती. आता कोरोनाचा काळ असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.