फिटनेसबाबत वाढली जागरूकता, लाकडी घाण्याच्या तेलाकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:45 PM2024-05-22T15:45:52+5:302024-05-22T15:46:29+5:30
आरोग्यासाठी लाभदायक : शहरातील नागरिकांकडून मागणी वाढतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पारंपरिक उद्योगांपैकी एक असलेला लाकडी घाणा तेल उद्योगाला आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत. मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ हा व्यवसाय संपला होता; पण वाढते प्रदूषण, डिजिटल युगात अनेकजण केमिकलविरहित, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तेल वापरणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पुन्हा ग्रामीणसह शहरी भागातही लाकडी घाण्याला चांगले दिवस येत आहेत. या तेलामुळे आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होत आहे.
पूर्वी ग्रामीण भागात तेल काढण्याचे घाणे होते. अनेक व्यावसायिक, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला देखील काम मिळत होते. बहुतांश शेतकरी शेतात पिकविलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल घेत. शिवाय पशुखाद्य म्हणून सरकी, करडी पेंढीचा उपयोग व्हायचा, तसेच केमिकलविरहित तेल खायला मिळत होते. दरम्यान, रिफाइंड तेलाच्या वापरामुळे या व्यवसायाला घरघर लागली; परंतु आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला खाण्याचे शुद्ध तेल मिळावे म्हणून पुन्हा तेलबीयांचे उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी करडई, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे लाकडी घाण्याच्या तेलाचे प्रमाण देखील वाढत आहे.
तेलाला नैसर्गिक सुगंध, पोषक घटकांचा समावेश
घाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबा- बतच्या जागरूकतेचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे.
अनेकांच्या हाताला काम
लाकडी घाण्यातील तेल प्रक्रियेत गळीत धान्य निवडण्यापासून ते तेल मिळेपर्यंतच्या विविध स्तरांवर कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे भागात पुन्हा कामगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.
मागणी अधिक
सध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबीयांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते.फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.
चंद्रपूर शहरात आठ ते दहा घाणे
घाण्याच्या तेलाची मागणी वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काहींनी घाणीचे तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरमध्ये आठ ते दहा घाण्या असून या व्यावसायिकांकडे तेल घेणाऱ्यांची बरीच गर्दी दिसून येते.