उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे वाढले क्षारांचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:08+5:302021-04-09T04:30:08+5:30
आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य ...
आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य नसेल तर आरोग्य धोक्यात येत असते. असेच काहीसे तालुक्यातील औद्योगिक भागात निदर्शनास येत आहे.
उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरातील अनेक ठिकाणी भूजलाच्या साठ्यात क्षारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सर्वसामान्यपणे शुद्ध पाणी मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. शरीरास थोडेसे क्षार असणारे पाणी आवश्यक असतेच; परंतु पाणी अशुद्ध असेल तर ते आजाराला आमंत्रित करत असते. दरवर्षी एकरी चार टन क्षारांचा भरणा निरनिराळ्या माध्यमातून होत असून, प्रदूषित पाण्याचे संकट वाढतच आहे व स्वच्छ पाण्याचे साठे दूषित होत आहेत. त्यासाठी वेळीच जागृती झाली पाहिजे. औद्योगिक भागासोबतच ग्रामीण भागातसुद्धा परिस्थिती सारखीच होत चालल्याने भविष्यात दूषित पाण्यामुळे पिण्याचा पाण्याची बोंब नक्कीच होणार, यात काही शंका नाही.
पिण्याच्या पाण्यात कार्बोनेट, क्लोराईड, फॉस्फेट, बायकार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट अशा अनेक क्षारांचा भरणा उद्योगातील भागात वाढत असून, त्याचा मानवी व जनावरांच्या किडनीवर परिणाम होताना दिसून येत आहे.
मानवाला पाण्याचा माध्यमातूनच जास्तीत जास्त विकार होत असतात. टायफाॅईड, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ, त्वचा रोग, अस्थिव्यंग, पोटदुखी, मूतखडा, श्वसनाचे, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी पिल्याने होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.