नगर विस्तार वाढला समस्या कायम
By admin | Published: January 6, 2016 01:28 AM2016-01-06T01:28:22+5:302016-01-06T01:28:22+5:30
कोरपना नगर पंचायतीची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तसाच उमेदवारांचा प्रचारातील उत्साह वाढत आहे.
मतदारांचा आग्रह : चौकांना सौंदर्यीकरणांची प्रतीक्षा
जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना)
कोरपना नगर पंचायतीची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तसाच उमेदवारांचा प्रचारातील उत्साह वाढत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उमेदवारसुद्धा प्रचार कार्यात गुंतल्या आहे. मात्र नगरांचा ज्याप्रमाणे विस्तार वाढला आहे, त्याप्रमाणे नगरातील समस्याही मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असून या समस्या सोडविण्याची मागणी आहे.
शहरातील प्रभाग क्र. ५ ते १७ हा मध्यवर्ती लोकवस्तीचा भाग आहे. या प्रभागात शेतकरी, शेतमजूर कर्मचारी, व्यापारी आदी वर्ग वास्तव्यास आहे. प्रभाग क्र. ५ हा पूर्वेस जुन्या आय.टी.आय.पासून ते पश्चिमेस राजीव गांधी चौक, उत्तरेस मुख्य मार्ग (बायपास रस्ता) ते दक्षिणेस मुख्यमार्गापर्यंत विस्तारलेला आहे. या प्रभागाचा महत्त्वपूर्ण अंग हा राजीव गांधी चौक आहे. परंतु, या चौकांचे अपेक्षित सौंदर्यकरण अद्यापही झालेले नाही. या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच या प्रभागातील बायपास रस्त्याचे सिमेंटीकरण व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या प्रभागाला जोडणाऱ्या मुख्य मार्गाचे संपूर्ण सिमेंटीकरण झाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे. प्रभाग क्र. ६ हा पूर्वेस जुना पोलीस स्टेशन रोड ते पश्चिमेस शासकीय वसाहत, उत्तरेस आंबेडकर चौक ते दक्षिणेस मुख्य मार्गापर्यंतचा भाग समाविष्ट आहे. या प्रभागात दलित लोकवस्ती आहे. येथील रस्त्याचे सिमेंटीकरण झाले असले तरी रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यांची पूर्णबांधणी होणे आवश्यक आहे.
प्रभाग ७ पूर्वेस तहसील मार्ग ते पश्चिमेस हजारे यांचे घरापर्यंत, उत्तरेस जामा मस्जिदपासून ते दक्षिणेस उलमाले यांच्या घरापर्यंत आहे. या भागात मुख्य समस्या सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यांची आहे. प्रभाग क्र. ८ पूर्वेस रहेमान अली यांच्या घरापासून समाज सभागृहापर्यंत, उत्तरेस दुरुटकर यांच्या घरापासून ते दक्षिणेस वसंतराव नाईक विद्यालयापर्यंत आहे. या भागातील रस्त्याचे सिमेंटीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रभाग ९ मधील रस्त्याचे खडीकरण करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. प्रभाग क्र. १० मध्ये मेन रोड ते तलाव पायथ्यापर्यंत येथील नाल्यावर रपटेनिर्माण करण्यात आले. त्यांच्या कडाबाजू समांतर करण्यात यावी अशी येथील जनतेची अपेक्षा आहे. प्रभाग क्र. ११ मध्ये कचराकुंड्याची सोय करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते व नाल्या यांची बांधणी करण्यात यावी.
प्रभाग क्र. १२ मध्ये अंतर्गत रस्त्याची सुविधा होणे अपेक्षित आहे. प्रभाग क्र. १३ नाल्यांची उंची वाढण्याची गरज आहे. प्रभाग क्र. १४ येथेही अंतर्गत रस्त्याचे सिमेंटीकरण होणे आवश्यक आहे.
प्रभाग क्र. १५ उत्तरेस आठवडी बाजारपासून ते दक्षिणेस लांडे यांचे घरापर्यंत, पूर्वेस टेलिफोन एक्सचेंजपासून ते पश्चिमेस गंगशेट्टीवार यांचे दुकानापर्यंतचा भाग समाविष्ट आहे. येथील रस्ते व नाल्यांची व्यवस्था होणे आवश्यक आहे. प्रभाग क्र. १६ उत्तरेस हनुमान मंदीर पासून ते दक्षिणेस तहसिल रोडपर्यंत, पूर्वेस एकात्मिक वनविकास प्रकल्प कार्यालयापर्यंत, पश्चिमेस रहेमान यांच्या घरापर्यंतचा भाग आहे. येथील नाल्या उंच व रस्ते खाली परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यावर भर टाकून खडीकरण होणे आवश्यक आहे.
प्रभाग क्र. १७ उत्तरेस शासकीय गोदामपासून ते दक्षिणेस तहसिल मार्ग, पूर्वेस घुमे यांचे घरापासून ते इंदिरानगर चौकपर्यंतचा भाग आहे. येथील अंतर्गत रस्त्यांची समस्या मोठी गंभीर आहे.