मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:54+5:302021-08-21T04:32:54+5:30
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील पिंपळगाव, अऱ्हेर नवरगाव, नांदगाव, नाहोरी, कलेता, तोरगाव, मौशी आदी गावातील टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी टॉवर लाईनचा ...
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील पिंपळगाव, अऱ्हेर नवरगाव, नांदगाव, नाहोरी, कलेता, तोरगाव, मौशी आदी गावातील टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी टॉवर लाईनचा मोबदला न मिळाल्याने उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील शेतशिवारातून रायपूर, राजनांदगव, वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची ७६५ के. व्ही. उच्च दाबाची विद्युत वहिनी ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव, अऱ्हेर नवरगाव, नांदगाव, नाहोरी, कलेता, तोरगाव, तर नागभीड तालुक्यातील मौशी, विलम, मोहाडी, बामणी, मांगली, तेलीमेडा, बालापूर येथून गेली आहे. टॉवर उभारणीपूर्वी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र, या टॉवरवरून लाईनही सुरू करण्यात आली आहे. हे काम होऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातून रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची ७६५ के. व्ही. उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली असून, टॉवर लाईनच्या परिसरात काम करणे शेतकऱ्यांना धोक्याचे असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतकाम करावे लागते. पण, संबंधित कंपनीने निर्धारित केलेला मोबदला मागील तीन वर्षांपासून टॉवर लाईनग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचविलेला नाही. शेतकऱ्यांनी याबाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांकडे निवेदनाद्वारे मदतीचा हात मागितला असता त्यांनी दिलेल्या निवेदनांना केराची टोपली दाखवली. कंपनी शेतकऱ्यांना भूलथापा देत आहे. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी रायपूर, राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीविरोधात ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
कोट
मागील कित्येक दिवसांपासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे व काही राजकीय नेत्यांकडे निवेदने दिली आहेत. कार्यालयात हेलपाटे घातले. मात्र, अद्याप आम्हाला मोबदला मिळालेला नाही. आम्हाला मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार.
- हरिश्चंद्र ठेंगरे, टॉवर लाईनग्रस्त शेतकरी
200821\img-20210820-wa0101.jpg
टॉवर लाईन ग्रस्त शेतकरी साखळी उपोषण करताना