चंद्रपूरचे एकमेव अपक्ष आमदार कोणाच्या खेम्यात? कधी भाजप तर कधी मविआची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 12:55 PM2022-06-08T12:55:18+5:302022-06-08T13:04:44+5:30

खुद्द आमदार जोरगेवार यांनीही याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट न झाल्याने संभ्रम वाढला आहे.

independent mla kishor jorgewar whose side will take in rajya sabha election war | चंद्रपूरचे एकमेव अपक्ष आमदार कोणाच्या खेम्यात? कधी भाजप तर कधी मविआची चर्चा

चंद्रपूरचे एकमेव अपक्ष आमदार कोणाच्या खेम्यात? कधी भाजप तर कधी मविआची चर्चा

googlenewsNext

राजेश भोजेकर

चंद्रपूर :चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार किशोर जोरगेवार राज्यसभा निवडणुकीसाठी कोणाच्या खेम्यात जातील, अशी चर्चा रंगू लागली आहे. राजकीय वर्तुळात कधी ते भाजपच्या दावणीला बांधले जातील तर कधी महाविकास आघाडीच्या बाजूने जातील, अशी चर्चा आहे. खुद्द आमदार जोरगेवार यांनीही याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट न झाल्याने संभ्रम वाढला आहे.

मुंबईत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. यानंतर सर्व आमदारांना त्यांनी मुंबईत बोलावून घेतले. शिवाय महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतील आमदारांना मुंबईला बोलावून घेतले आहेत. आमदार किशोर जोरगेवार हे सुद्धा सोमवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. ते नेमके कोणत्या खेम्यात दाखल झाले याची उत्सुकता चंद्रपूरकरांना आहे. मुंबईला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेटही राजकीय स्वरूपाचीच होती, अशी चर्चा आहे.

तर नवे राजकीय समीकरण

आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपच्या गोटात जाऊन मतदान केले तर चंद्रपुरातील राजकारणात नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या भूमिकेकडे बघितले जात आहे. २०२४ मध्ये निवडणुकीसाठी आमदार जोरगेवार पक्षाचा शोध घेत असल्याची चर्चा आहे. कधी राष्ट्रवादी काँग्रेस, तर कधी काँग्रेस आणि शिवसेना यापैकी कोणता पक्ष योग्य ठरेल, याची चाचपणी ते घेत असल्याचे समजते. भाजपकडूनही लढू शकतात, अशाही चर्चा आहेत.

जनाधारात घसरण

किशोर जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत ७० हजारांवर मताधिक्याने विजयी झाले. ही मते त्यांना भाजपच्या उमेदवाराविरुद्ध मिळालेली होती. असे असताना त्यांनी निवडून येताच भाजपला राज्यात सत्ता स्थापनेसाठी आपला पाठिंबा असल्याचे पत्र दिले होते. त्या क्षणापासून मतदारसंघात त्यांच्याबद्दल असलेली जनभावना बदलली. ही बाब त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे.

२०० युनिट वीज केव्हा मिळणार?

२०१४ च्या निवडणुकीत जोरगेवार यांनी २०० युनिट वीज मोफत मिळवून देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यावर काहीही झाले नाही. राज्यसभा निवडणुकीत आमदार जोरगेवार महाविकास आघाडी सरकारला या विषयावर कोंडीत धरतील, अशी चर्चा आहे. मागील अडीच वर्षांत कोणतीही ठोस विकासकामे चंद्रपुरात आल्याचे ऐकिवात नाही. कोणत्याही कामासाठी निधी आला की त्यांचा फलक पहिले लागतो हे विशेष.

मविआच्या बैठकीला हजेरी

आमदार किशोर जोरगेवार हे जिल्ह्यात एकमेव अपक्ष आमदार आहेत. मंगळवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ते सहभागी झाले होते.

Web Title: independent mla kishor jorgewar whose side will take in rajya sabha election war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.