स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा चंद्रपुरात गुंजला
By Admin | Published: January 25, 2016 01:18 AM2016-01-25T01:18:25+5:302016-01-25T01:18:25+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा नारा शनिवारी पुन्हा चंद्रपुरात गुंजला. राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांचे
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा नारा शनिवारी पुन्हा चंद्रपुरात गुंजला. राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांचे अभ्यासपूर्ण भाषण, अॅड. वामनराव चटप यांचे यांचे जोशपूर्ण आवाहन आणि राष्ट्रसंतांचे प्रचारक लक्ष्मणदास काळे महाराज यांनी केलेली विदर्भ राज्याच्या निर्मितीची मांडणी यामुळे उपस्थितांची मने चेतली. भाषणादरम्यान युवकांनी दिलेल्या घोषणा आणि धिरगंभीर आवाजात विदर्भ निर्मितीसाठी घेतलेली शपथ यामुळे शनिवारच्या या समारंभातून विदर्भ निर्मितीच्या चळवळीतील एक नवा इतिहासच या निमीत्ताने रचला गेला.
स्थानिक जनता महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी हे व्याख्यान पार पडले. प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पुढाकारात आणि विदर्भ राज्य आघाडीच्या सहकार्याने पार पडलेल्या या व्याख्यानाला विदर्भवासीयांनी केलेली गर्दी हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला.
विदर्भ ध्वज फडकावून उत्साहात प्रारंभ झालेल्या या समारंभाने सुरूवातीपासूनच वेगळी उर्जा जागविली. मंचावर अॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप, गुरूदेव प्रचारक लक्ष्मणदास काळे महाराज, अॅड. रवींद्र भागवत, अॅड. विजयालक्ष्मी अणे यांच्यासह विदर्भ राज्य आघाडीचे सचिव अॅड. रवी सन्याल, निरज खांदेवाले, महासचिव वासूदेव विधाते, अॅड. मुकेश समर्थ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, डॉ. अशोक जीवतोडे, विदर्भ राज्य आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू धोतरे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जीवतोडे उपस्थित होते.
आपल्या ४५ मिनिटांच्या जोशपूर्ण भाषणात अॅड. अणे म्हणाले, निवडणुकीत विदर्भाच्या नावाने मते मागणाऱ्यांची मानसिकता तपासा. विदर्भाचे नाव घेताना उमेदवार बोलतो की पक्ष बोलतो, हे बघा. विदर्भाच्या बाजूने आहोत म्हणाणारे विदर्भासाठी खरेच किती लढतात हे महत्वाचे आहे. अॅड. वामनराव चटपांसारखे प्रामाणिकपणे विदर्भासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा.
विधिमंडळातील संख्यात्मक बळ सांगून अॅड. अणे म्हणाले, २५० आमदारांमध्ये सध्या विदर्भाचे ६२ आहेत. २५० विरूद्ध ६२ असा ठराव टिकणार नाही. पुढची विस वर्षे तो पास होणार नाही. त्यामुळे विदर्भाच्या बाजूने बोलणाऱ्या माणसांना जिंकविणे महत्वाचे आहे. विदर्भाच्या मतांचा विचार केला तर, बहुजन समाज पक्षाचे व्होट काऊंटर दुसऱ्या क्रमावर आहे. त्यामुळे बीएसपीला जिंकविणे हे विदर्भाच्या दृष्टीने इतरांच्यापेक्षा कितीतरी पटीने फायद्याचे आहे. याचा अर्थ आपण बीएसपीच्या प्रचाराला आलो, असा कुणी काढू नये.
जे विदर्भवादी आहेत, त्यांना निवडून पाठविणार नाही, तोपर्यंत आपला आवाज बुलंद होणार नाही. आपल्या आवेशपूर्ण आणि आकडेवारी मांडणाऱ्या भाषणातून अॅड. वामनराव चटप यांनी वेगळाच जोश भरला. शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, विदर्भ हे अमराठींचे राज्य आहे म्हणत असले पवार म्हणत असले तरी त्यांनी या आंदोलनात कोण आहेत हे बघावे. (जिल्हा प्रतिनिधी)
राजीनाम्यासाठी दबाव नाही - अणे
४राज्याचे महाधिवक्ता असतानाही विदर्भाबाबत बोलत असल्याने शरद पवारांनी कारवाईची मागणी केली असल्याकडे पत्रकारांनी अॅड. अणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आपल्यावर कारवाई करण्याची मागणी पवारांनीच काय, अनेकांनी केली आहे. त्याचा विचार सरकारने करावा. राज्यपाल ज्या दिवशी आपणास राजीनामा द्यायला सांगतील, त्या दिवशी आपण या पदाचा राजीनामा देऊ. मात्र अद्याप तरी आपणास मुख्यमंत्री अथवा पक्षाचा कसलाही दबाव नाही. आपण राज्याचा महाधिवक्ता असलो तरी विदर्भाचा असल्याने विदर्भाबद्दल मत मांडण्याचा माझा अधिकार कुणी हिरावू शकत नाही. विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व आपण करणार नाही. नेतृत्वासाठी आपण पुढे आलेलो नाही. आपल्या तीन पिढ्या विदर्भासाठी खपल्या. त्याच भावनेतून आपण हा विचार घेऊन जनतेपर्यंत जातो. विदर्भलढ्याचे नेतृत्व विदर्भातूनच तयार व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आजवर ४५० ग्रामपंचायतींचे ठराव झाले आहेत. अन्य ग्रापंचायतींनीही पुढे यावे. संस्था, संघटना, बँका यांनीही तसे ठराव ठेऊन पाठवावे. विदर्भासाठी केंद्रावर सवारंनी दबाव वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
वडापाव आमचं
खाद्य नाही
४मुंबईच्या गप्पा हाकणाऱ्यांना चिमटा काढताना अॅड. अणे म्हणाले, आम्ही विदर्भाचे आहोत. आपली भाषा वेगळी, बोली, आवडसुद्धा वेगळी. वडापाव आमचे खाद्य नाही. आम्ही मिसळ खातो. त्यामुळे विदर्भाचे आहोेत, असे सांगताना लाज बाळगू नका. माय-बाप कुठला हे सांगाताना लाज कशाला बाळगायची. गर्वाने सांगा, आम्ही विदर्भाचे आहोेत.