लंडनच्या विद्यापीठात भारतीय तरुणाचा डंका; विद्यार्थी संघ निवडणुकीत बाजी
By परिमल डोहणे | Published: March 15, 2023 11:56 AM2023-03-15T11:56:09+5:302023-03-15T11:58:12+5:30
निवडणूक जिंकणारा सुशांत सिंग पहिला दलित भारतीय विद्यार्थी
परिमल डोहणे
चंद्रपूर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दलित विद्यार्थी सुशांत सिंग याने एसओएएस विद्यापीठ लंडन येथे विद्यार्थी संघ निवडणुकीत यश प्राप्त केले आहे. सुशांतची विद्यार्थी संघाच्या वेलफेअर गटात अध्यक्ष पदावर निवड झाली आहे. मागील वर्षीदेखील त्याने ही निवडणूक जिंकत विदेशात जाऊन अटकेपार झेंडा रोवला आहे.
सुशांतचे कार्यक्षम नेतृत्व आणि समाजसेवेची बांधिलकी यामुळे त्याला दुसऱ्या वर्षीसुद्धा पुन्हा विजय मिळाला आहे. ही निवडणूक जिंकणारा तो पहिला दलित भारतीय विद्यार्थी ठरला असून त्याचे कौतुक होत आहे.
सुशांतचा शैक्षणिक प्रवास २०२१ मध्ये लंडनच्या एस.ओ.ए.एस. या मानवाधिकार क्षेत्रातील दर्जेदार विद्यापीठात सुरू झाला. ‘मानवी हक्क, संघर्ष आणि न्याय’ या विषयात कायद्याचे उच्च शिक्षण त्याने घेतले. याआधी सुशांतने राष्ट्रीय विधी विद्यापीठ दिल्ली येथे वकिलीचा अभ्यास केला.
वंचित समाजाच्या उन्नतीसाठी तो गरजू लोकांना मदत देखील करत असतो. विदेशातील विद्यापीठांत भेदभावरहित वातावरण असावे, जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी व शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्नरत राहील, असे सुशांतने सांगितले. निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थी ॲड. दीपक चटप चंद्रपूर, डॉ. ऋषीकेष आंधळकर यांच्यासह भारतीय विद्यार्थी उपस्थित होते.