भारतीय विद्यार्थी मोर्चाचे निवेदन
By admin | Published: January 31, 2016 01:00 AM2016-01-31T01:00:01+5:302016-01-31T01:00:01+5:30
हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पस वसतिगृहात राहणाऱ्या रोहित वेमुला या हुशार व बुद्धीमान विद्यार्थ्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन ...
रोहित वेमुला आत्महत्याप्रकरण : कारवाईची मागणी
ब्रह्मपुरी : हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पस वसतिगृहात राहणाऱ्या रोहित वेमुला या हुशार व बुद्धीमान विद्यार्थ्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन भाजपा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच अन्य चार विद्यार्थ्यांवर खोटे आरोप लावून व बदनामी करून वसतिगृहातून काढले. याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर व भाजपातील केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय व केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे यांना दिलेल्या निवेदनात रोहित वेमुला व त्याच्या मित्रांवर लावलेले चुकीचे आरोप रद्द करण्यात यावे, वेमु यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, कुलगुरू राव व आर.पी. शर्मा यांना अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. अभाविप या संघटनेवर बंदी घालण्यात यावी आदी मागण्या भारतीय विद्यार्थी मोर्चाने रेटून धरल्या आहेत. यावेळी रोहित वेमु या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा प्रमुख बंटी गोंडाने, तालुका प्रमुख दीपक ढोरे, प्रज्ञानंद माटे, अतुल राऊत, प्रतिक ठवरे, क्रिष्णा राऊत, सुमित झोडे, मयुर चहांदे, रवी पंचभाई, प्रज्वल वाघमारे, जितेंद्र सहारे, सौरभ सैजारे आदी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)