पोंभुर्णा येथे औद्योगिक वसाहतीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:34 PM2018-11-30T23:34:16+5:302018-11-30T23:34:44+5:30
चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता प्रदान केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता प्रदान केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यात यावे, यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. विधानसभा सदस्य असताना त्यांनी सदर मागणी विधानसभागृहाच्या माध्यमातून सातत्याने रेटली व पाठपुरावा केला. पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मौजे कोसंबी (रिठ) खासगी १०२.५० हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (२) अन्वये जमिनीचे नुकसान भरपाईचे दर निश्चितीबाबत प्रस्ताव उच्चाधिकारी समिती पुढे सादर करण्यात आला होता.
१९ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती प्रस्तावित केल्याप्रमाणे कोसंबी (रिठ) येथील खासगी १०२.५० हे. आर क्षेत्रात प्रति हेक्टर १० लाखप्रमाणे दरास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन करण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.
पोंभुर्णा तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा व तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. पोंभुर्णा पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी ही आदिवासी महिलांची महाराष्ट्रातील पहिली कुक्कुटपालन व्यवसाय करणारी संस्था त्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली आहे.
पोंभुर्णा तालुक्यात दुग्ध व्यवसाय प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प असे विविध प्रकल्प राबवून या तालुक्याला रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन होण्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या मानसाला बळकटी प्राप्त होणार आहे.
बांबू संशोधन केंद्रासाठी बस उपलब्ध
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट या संस्थेच्या उदघाटन समारंभात अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर युनिटला भेट देण्यास येणाऱ्या लोकांसाठी, संशोधकांच्या प्रवासासाठी तसेच महिला कामगारांची ने-आण करण्यासाठी २५ सीटर बस बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासनाची पूर्तता झालेली असून बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २५ सीटर बस उपलब्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाने २९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तत्संबंधाने सूचना दिल्या आहेत.