लोकांच्या जिवापेक्षा उद्योग मोठा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:35+5:30
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्निल राठोड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : औद्योगिक प्रदूषणामुळे चंद्रपूर व परिसरातील झाडे काळसर पडली. जगाच्या पाठीवर कदाचित हे एकमेव उदाहरण असेल जेथे झाडांचा रंग हिरव्यासोबतच काळा बघायला मिळतो. प्रदूषण समस्येची तीव्रता लक्षात येण्यासाठी शहरात लावलेले कृत्रिम हृदय पाच दिवसांतच काळे पडले. कंपन्या केवळ नफेखोरीत व्यस्त असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळत आहे. लोकांच्या जिवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज आढावा बैठकीत दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्निल राठोड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, उद्योगांच्या विरोधात आम्ही नाही. नियमाला धरून उद्योग चालले पाहिजे. वेकोलिमुळे जिल्ह्याची वाट लागली. कोळशाच्या सायडिंगवर ते कधी पाणी मारत नसल्यामुळे धूळ उडते. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात लोडेड वाहतूक होत आहे.
याकडे पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिले. बैठकीला वेकोलि, कोल वॉशरीज, ग्रेस इंडस्ट्रिज, चमन मेटॅलिक, बोपानी आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोल वॉशरीजला नोटीस देण्याच्या सूचना
ग्रामीण रस्त्यांवरून वाहतूक क्षमता १० टनापर्यंत असते. इतर जिल्हा मार्गाची क्षमता १५ टन, जिल्हा मार्ग २० टन, तर राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून २५ टनांच्यावर असते. मात्र, येथे ग्रामीण रस्त्यावरूनही ४० टनांच्या क्षमतेची वाहतूक होत आहे. महसूल, बांधकाम, पोलीस व आरटीओ विभागाची संयुक्त समिती गठीत करावी व कोल वॉशरीजला नोटीस बजावा, असे निर्देशही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले.