पोळ्याच्या तोंडावर देवाडा खुर्द येथे जनावरांना संसर्गजन्य रोगांची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:03+5:302021-09-06T04:32:03+5:30
दहा जनावरांचा मृत्यू : पशुपालकांची वाढली चिंता पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावांतील जनावरांवर ...
दहा जनावरांचा मृत्यू : पशुपालकांची वाढली चिंता
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावांतील जनावरांवर अज्ञात संसर्गजन्य रोगाने आक्रमण केले आहे. या रोगामुळे गावातील दहा जनावरे दगावली आहेत. बैलपोळ्याच्या तोंडावरच जनावरे दगावत असल्याने पशुपालक चिंतेत असून त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पशू विभागाच्यावतीने गावात तत्काळ लसीकरण कॅम्प घेण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
देवाडा खुर्द व रामपूर दीक्षित या गावांतील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. शेकडो जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. मागील दोन दिवसात गावातील दहा जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केले जात नसल्याने गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या देवाडा खुर्द गावासह तालुक्यातील काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंडखुरी येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होत आहे, तर शेतीकामावरही परिणाम होत आहे. गाय, म्हैस, बैल यांसह वासरांनाही या तोंड व पायखुरी रोगाने ग्रासले आहे.
मागील दोन दिवसांपासून या अज्ञात संसर्गजन्य रोगामुळे जनावरे दगावत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशू विभागाच्यावतीने गावात तत्काळ जनावरांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
कोट
देवाडा खुर्द गावातील जनावरांना अज्ञात संसर्गजन्य रोगांची लागण झाली आहे. गावातील अनेक गुरे रोगाने ग्रस्त असून दोन दिवसात दहा जनावरे दगावली आहेत. पशुपालक चिंतेत असून त्यांचे फार मोठे नुकसान होत आहेत.
- विलास मोगरकर, सरपंच, ग्रामपंचायत, देवाडा खुर्द