माजी महापौर, माजी उपमहापौर, विरोधी पक्षनेत्याच्या वाॅर्डात निकृष्ट दर्जाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:06+5:302021-04-07T04:29:06+5:30
चंद्रपूर : येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विवेकनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सध्या सुरू असलेले विकासकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू ...
चंद्रपूर : येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विवेकनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सध्या सुरू असलेले विकासकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. त्यातच अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे बांधकाम तसेच पेव्हिंग ब्लाॅक लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा योजनेसाठी आणखी खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे किमान काही दिवस काम थांबवून प्रथम अमृत योजनेचे काम करावे, त्यानंतरच रस्ता तसेच पेव्हिंग ब्लाॅक लावावे, जेणे करून सरकारच्या पैशाची उधळपट्टी होणार नसल्याची भावना येथील नागरिकांची आहे. मात्र, वाॅर्डाचे नेतृत्व करीत असलेले माजी महापौर, माजी उपमहापौर, नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विवेकनगर प्रभाग क्रमांक ५ हा गुरुद्वारापासून आदर्श पेट्रोल पंप, पोलीस वसाहत. वाहतूक पोलीस कार्यालय तसेच तुकूमकडून गुरुद्वाराकडे जाणारा रस्ता असा प्रभाग आहे. या प्रभागाचे नेतृत्व माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, पुष्पा उराडे हे भाजपाचे तर डाॅ. सुरेश महाकुलकर हे काँग्रेसचे नगरसेवक आहे. सद्यस्थितीत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. प्रभागातही तीन भाजपाचे नगरसेवक असल्यामुळे बहुमत आहे, तर महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे नगरसेवक सुरेश महाकुलकर यांच्यावर जबाबदारी आहे. महापालिकेतील महत्त्वाचे पद महाकुलकर यांच्याकडे आहे. त्यामुळे या वाॅर्डातील समस्या निकाली निघणे सामान्य नागरिकांना अपेक्षित होते. मात्र, येथे सर्व आलबेल असल्याचा आरोप नागरिक करीत असून, संताप व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
विरोधी पक्षनेते केवळ नावालाच
येथील महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे डाॅ. सुरेश महाकुलकर यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र, ते विरोधी पक्षनेत्याची भूमिका कमी आणि सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर लावण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप त्यांच्याच वाॅर्डातील नागरिक करीत आहेत. वाॅर्डात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असतानाही त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक नागरिक तक्रार करीत असले तरी त्यांच्या तक्रारीकडेही त्यांचे मुळीच लक्ष नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
माजी महापौरांचेही झाले दुर्लक्ष
येथील भाजपाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या अंजली घोटेकर यांना वाॅर्डातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आणत महापालिकेत पाठविले. त्यांच्या निवडीमुळे वाॅर्डाचा विकास होईल, असा विश्वास नागरिकांना होता. एवढेच नाही तर त्यांची पहिल्या टप्प्यामध्ये महापौरपदी वर्णी लागली. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा आणखीच वाढल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी पाहिजे तसे कामच केले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाॅर्डातील रस्ते चकाचक दिसत असले तरी नाल्या, ओपन स्पेसकडे तसेच सध्या सुरू असलेल्या विकासकामांच्या निकृष्ट दर्जाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगरसेवक होण्यापूर्वी त्या वाॅर्डात नागरिकांना दिसत होत्या. मात्र, आता त्यांचे दर्शनही दुर्लभ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
माजी उपमहापौरांकडूनही अपेक्षाभंग
महापालिकेतील डॅशिंग नगरसेवकांमधील एक असलेले माजी उपमहापौर संदीप आवारी या प्रभागाचे नेतृत्व करतात. त्यांना राजकीय तसेच सामाजिक कामाचा चांगलाच अनुभव आहे. यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांनी प्रभागामध्ये बऱ्यापैकी कामे केली आहेत. मात्र, सद्यस्थितीत त्यांचेही प्रभागाकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
नाल्या खचल्याने पाणी तुंबले
प्रभागामध्ये बऱ्यापैकी सिमेंट रस्ते झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र रस्ते चकाचक दिसत असले तरी बहुतांश नाल्या खचल्या आहेत. सिमेंट रस्त्यामुळे त्या दबल्या असून, नाल्यांमध्ये माती जाऊन त्या बुजल्या आहे. त्यामुळे सिमेंट रस्ते करताना नाल्यांचीही उंची वाढविणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुसरीकडे विवेकनगरातील अंडरग्राउंड नाल्या तयार करण्यात आल्या आहेत; मात्र पाणी जातच नसल्यामुळे त्या मधेमध तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या उद्देशासाठी नाल्या तयार करण्यात आल्या, त्या उद्देशाला बगल देण्यात आली आहे. परिणामी मच्छरांचा प्रकोप वाढला असून, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
बाॅक्स
पाणीपुरवठा अनियमित
प्रभागामध्ये महापालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी अमृत योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत जुन्याच पाइपलाइनमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तो अनियमित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बहुतांश नागरिकांकडे बोअरवेल, विहिरी आहेत. मात्र, यातील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
गोपालनगर ओपन स्पेसची दुरवस्था
गोपालनगर परिसरात असलेल्या ओपन स्पेसमध्ये विविध खेळण्यांचे साहित्य लावण्यात आले आहे, तर नागरिकांना चालण्यासाठी पेव्हिंग ब्लाॅकसुद्धा लावले आहे. मात्र, या ओपन स्पेसच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. येथील लावण्यात आलेले शोभिवंत गवतही पूर्णत: सुकले असून, ते लावले होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच येथे काही असामाजिक तत्त्वांचे काही नागरिक आपले शौक पूर्ण करीत असल्यामुळे भविष्यात अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अन्य ओपन स्पेसचा विकास बघता येथे खर्च करण्यात आलेला पैसा गेला कुठे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
बाॅक्स
नागरिक म्हणतात......
महापालिकेत वाॅर्डाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांचे प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासनही ते विसरले आहेत. काही विकासकामे सुरू आहेत. मात्र, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी केली जात आहे. स्वच्छतेकडेही फारसे लक्ष देत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
-उमाकांत धांडे
नागरिक
कोट
सध्या गुरुद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लाॅक लावण्यात येत आहेत. मात्र, ते लावताना प्रथम नाल्यांची उंची वाढविणे गरजेचे होते. तसेच वाॅर्डातील काही रस्त्यांवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेव्हिंग ब्लाॅक लावण्यात येत असून, तेही व्यवस्थित लावले जात नाहीत. वाॅर्डात इतरही समस्या आहेत. मात्र नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे.
-दिनकर मुसळे
नागरिक
कोट
अमृत योजनेचे शहरात काम सुरू आहे. या प्रभागात काही ठिकाणी काम झाले आहे. मात्र, अमृत योजनेच्या कामापूर्वीच सिमेंट तसेच पेव्हिंग ब्लाॅक लावले जात आहेत. त्यामुळे पुन्हा रस्ता फोडून काम करण्यापेक्षा अमृतचे काम करूनच रस्ता तसेच पेव्हिंग ब्लाॅकचे काम केल्यास शासनाच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही. त्यातच प्रभागातील सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
-यशवंत चाफले
नागरिक