कपाशी पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव
By admin | Published: September 20, 2015 01:26 AM2015-09-20T01:26:14+5:302015-09-20T01:26:14+5:30
चंद्रपूर उपविभागातील बल्लारपूर, चंद्रपूर या तालुक्यामध्ये कपाशी पिकावर तुडतुडे, फुल किडे व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर उपविभागातील बल्लारपूर, चंद्रपूर या तालुक्यामध्ये कपाशी पिकावर तुडतुडे, फुल किडे व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडी कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात. झाडाची वाढ खुंटते. यामुळे उत्पादन खालावण्याचा धोका वाढला आहे.
सद्य:स्थितीत धान पिकावर करपा, कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर कृषी विभागाने उपायोजना सुचविली आहे. ट्रायसायक्लोझोल ७५ टक्के डब्ल्यूपी सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फिप्रोनिल (दाणेदार) ०.३ टक्के हेक्टरी २५ किलो तसेच पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भावावर कॉरटाप हायड्रोक्लोराइड ५० एसपी २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे, असे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अशी करावी उपाययोजना
या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळल्यास डायफेनथुरोन ५० डब्ल्यूपी सहा ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ एससी १३ मिली किंवा प्लुनिकामाईड ५० डब्ल्यूजी दहा ग्रॅम किंवा फिप्रोनिल पाच एससी २० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेअरने फवारणी करीत असल्यास किटकनाशकाची मात्रा तिपटीने वाढवावी. कपाशी पिकावर पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव आढळल्यास गाजरगवत व इतर धुऱ्यालगतच्या तणाचा नायनाट करावा.