विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:36 AM2017-06-22T00:36:31+5:302017-06-22T00:36:31+5:30
शाळकरी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी डिपाजीत रक्कम म्हणून आधी ५०० रुपये जमा करा, त्याशिवाय खाते उघडता येणार नाही.
पाटणच्या बँकेतील प्रकार : खाते उघडण्यासाठी ५०० रूपये जमा करण्याची अट
जिवती : शाळकरी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी डिपाजीत रक्कम म्हणून आधी ५०० रुपये जमा करा, त्याशिवाय खाते उघडता येणार नाही. या बँक व्यवस्थापकाच्या आदेशाने विद्यार्थी तसेच पालकवर्ग संभ्रमात पडला आहे. हा तर विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असे पालकांकडून बोलले जात आहे.
पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती देत असते. यामध्ये वर्ग १ ते १० च्या अनु.जमाती मुलामुलींना सूवर्ण महोत्सवी तर ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या अनु.जाती, विमुक्त भटक्या जाती जमाती फक्त विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक नावाची शिष्यवृत्ती मिळत असते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांचे खाते आवश्यक आहे.
मात्र बँक व्यवस्थापकाच्या आदेशाने खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्याला डिपाजीट भरणे आवश्यक आहे. जिवती तालुका आधीच मागासलेला असून येथे गरीब कुटूंब वास्तव्यात आहेत. अनेक हालअपेष्टा सहन करून आपल्या मुलांना शिक्षण देत असताना खाते उघडण्यासाठी डिपाझीट रक्कम कुठून भरायची, हा येथील गोरगरीब पालकांना प्रश्न पडला आहे.
विद्यार्थ्यांना डिपाझीट भरावी लागत नाही, असे शासनाचे अधिकारी म्हणत असले तरी बँक व्यवस्थापकाची मनमानी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास अडचणी येत आहेत. यावरुन शासन नियमाची पायमल्ली होताना याठिकाणी दिसत आहे.
जिवती येथे स्टेट बँकेची मागणी
संपूर्ण तालुक्यात केवळ एकच राष्ट्रीयीकृत बँक पाटण येथे आहे. पाटण येथे एकमेव स्टेट बँक असल्याने जनतेचे तसेच इतर अनेक कामे वेळेवर होत नाही. ही समस्या लक्षात घेता, जिवती येथे स्टेट बँकेची शाखा उघडण्यात यावी, अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असून येथे स्टेट बँक आवश्यक आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाचे व शासनाचे नेहमी दुर्लक्ष होताना दिसत आहे. बँकेची समस्या निकाली लागली तर विद्यार्थ्यांना सुद्धा अडचण जाणार नाही.