जखमी करून रुग्णवाहिका पळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:28 PM2018-03-10T23:28:46+5:302018-03-10T23:28:46+5:30
रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे सरकारी आदेश आहेत. मात्र, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे सरकारी आदेश आहेत. मात्र, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला. असे असताना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी रुग्णवाहिका पुढे दामटून कोठारी ठाण्यात लावल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता भटाळी फाट्याजवळ घडली. या घटनेने गोंडपिपरी येथील सोनटक्के कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोंडपिपरी येथील आनंदराव नामदेव सोनटक्के (५४) व मिलिंंद फुलझेले हे एमएच ३३-७३३३ दुचाकीने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एमएच ३१ सीक्यू -२६४२५ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने मागून दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत आनंदराव सोनटक्के हे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत होते. या रुग्णवाहिकेत धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका ही मंडळी बसली होती, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील सोनटक्के यांना रुग्णवाहिकेत बसवून तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, चालकाने रुग्णवाहिका दामटून कोठारीकडे रवाना झाले. हा प्रकार पाहून हादरलेल्या फुलझेले यांनी अन्य वाहनांना थांबविण्यासाठी गयावया केली. पण, एक तासापर्यंत कोणतेही वाहन थांबले नाही. दरम्यान, मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी हे आनंदराव यांना ओळखत असल्याने वाहन थांबविले. सोनटक्के यांना ग्रामीण रुग्णालयात दाखले केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
-तर जीव वाचला असता
धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका आदी कर्मचारी बसले होते. अपघातानंतर लगेच रुग्णालयात दाखल केले असते तर वडिलाचा मृत्यू झाला नसता. यासाठी रुग्णवाहिकेतील संंबंधित कर्मचारीच दोषी असल्याने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रशेखर सोनटक्के यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली आहे.
रूग्णवाहिकेत माझ्यासह अन्य आरोग्य कर्मचारी बसले होते. आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने दुचाकीच्या मागील बाजूस धडक दिली. हा प्रकार वाहन चालकाच्या लक्षात आला नसावा.
- विजया धात्रक,
वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र, धाबा