जखमी विद्यार्थ्याला तीन तास शाळेतच ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:40 PM2018-01-31T23:40:33+5:302018-01-31T23:41:04+5:30
शाळेत खेळ सुरू असताना विद्यार्थी अंगावर पडल्याने एका विद्यार्थ्याचा हात मोडला.
चंद्रजित गव्हारे।
आॅनलाईन लोकमत
आक्सापूर : शाळेत खेळ सुरू असताना विद्यार्थी अंगावर पडल्याने एका विद्यार्थ्याचा हात मोडला. विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाही शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले नाही. एवढेच नाही तर पालकांना माहिती देण्याचे साधे सौजन्यही दाखविले नाही. अखेर सुटी झाल्यानंतरच सदर जखमी विद्यार्थ्याला रडतरडत घरी यावे लागले. हा संतापजनक प्रकार सोमवारी गोंडपिपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला.
जखमी विद्यार्थ्याने घरी येऊन पालकांना घडलेल्या प्रकार सांगितला. कुटुंबीयाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी हात मोडल्याचे निदान केले आहे. हा प्रकार बुधवारी इतर पालकांनाही माहित होताच शिक्षकांच्या अशा असंवेदनशिलतेविषयी त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गोंडपिपरी येथील जि.प. उच्च प्राथमिक कन्या शाळेत ३१ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सोमवारी विद्यार्थ्याचा सराव सुरू होता. दरम्यान, इयत्ता सहावीतील विद्यार्थी प्रवीण हरिदास घोगरे हा लघुशंका करून येत होता. अशातच त्याच्या अंगावर काही विद्यार्थी पडले. यामुळे त्याच्या हाताला चांगलीच दुखापत झाली. हा प्रकार गंभीरच होता. मात्र वर्ग शिक्षिका अर्चना जिरकुंटवार यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयात दाखल करणे तर सोडाच; पण विद्यार्थ्याच्या पालकाला जखमीची माहिती देण्याचे साधे सौजन्यही या शिक्षिकेने दाखविले नाही. सायंकाळी विद्यार्थी घरी परतल्यानंतर हा प्रकार त्याने पालकांना सांगितला. यावेळी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्ष-किरण तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाºयांनी त्याचा हात मोडल्याचे स्पष्ट केले.
तब्बल तीन तास विद्यार्थ्याला वेदनेने विव्हळत शाळेतच सुटी होतपर्यंत ताटकळत रहावे लागले. यामुळे संतप्त झालेले पालक हरिदास घोगरे यांनी शाळेत जाऊन याप्रकरणी जाब विचारला. मात्र यावेळी मुख्याध्यापक कन्नाके यांनी विद्यार्थ्याने आम्हाला काही सांगितलेच नाही, असे सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, हा प्रकार बुधवारी गोंडपिपरीत पालकांच्या चर्चेचा विषय होता.