कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:23 AM2018-03-17T01:23:27+5:302018-03-17T01:23:27+5:30
जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात, कंत्राटी कामगारांना दोन ते चार हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळते. भविष्य निर्वाह निधीसुद्धा ठेकेदारांकडून भरला जात नाही. आरोग्य विभागाच्या कामगारांनी शासनाच्या नियमाप्रमाणे वाढीव वेतन मिळण्याकरिता निवेदन देवूनही दखल घेतली नाही. दरम्यान, मे २०१६ ला कामगारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांचे उपोषण केले होते. तत्कालीन कामगार आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राच्या आधारावर आंदोलन सुटले. आंदोलनाची दखल घेवून सहायक कामगार आयुक्तांनी चंद्रपुरात बैठक घेतली. तालुकास्तरीय झोन तीनमध्ये असलेल्या कामगारांना २६ दिवसीय कामांचे वेतन सहा ते सात हजार द्यावे.
भविष्य निर्वाह निधीचा संबंधित कंत्राटदाराने भरणा करावा, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कामगारांवरील अन्याय दर करावा. महानगरपालिका झोन २ करिता ८ हजार ३२८ ते ९ हजार ५२८ रुपये २६ दिवसीय कामगारास वेतन व भविष्य निर्वाह निधी द्यावे, असा आदेश शासनाने जारी केला. आरोग्य विभागातील कामे घेणाºया सर्व कंत्राटदारांनाही हा नियम लागू असताना जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही. शासन परिपत्रक व सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसविण्यात आले.
त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न तातडीने सोडवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे छोटु शेख यांनी एका शिष्टमंडळामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.