आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर अन्याय
By admin | Published: October 6, 2016 01:43 AM2016-10-06T01:43:10+5:302016-10-06T01:43:10+5:30
जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे गटशिक्षण आणि उपशिक्षणाधिकारी पदावर नुकतीच बढती मिळाली आहे.
संघटनेची मागणी : पदोन्नतीत होत आहे अन्याय
भेजगाव : जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे गटशिक्षण आणि उपशिक्षणाधिकारी पदावर नुकतीच बढती मिळाली आहे. यातून राज्यभरातील १०० मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली असून रिक्त असलेल्या जागांवर त्यांना नियुक्ती देण्यात आली.
मात्र या प्रक्रियेत आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर अन्याय करण्यात आला आहे.
शासकीय आश्रमशाळेमध्ये अनेक पदे कार्यरत आहेत. मात्र पदोन्नती करीत असताना माध्यमिक शिक्षकांना कोणत्या पदावर पदोन्नती देण्यात यावी, याबाबतचे नियम आयुक्त कार्यालयाकडून अजूनपर्यंत तयार करण्यात आलेले नाही. सध्या प्रचलित पद्धतीनुसार काठी माध्यमिक शिक्षकांना अप्पर आयुक्त स्तरावर माध्यमिक मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती देण्यात येते. तसेच आयुक्त यांच्या स्तरावर माध्यमिक शिक्षकांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण/उपशिक्षणाधिकारी या पदावर पदोन्नती देण्याची पद्धत सुरू आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांचे नेमके पहिल्या पदोन्नतीचे पद कोणते या संभ्रमात कर्मचारी आहेत.
सेवाज्येष्ठता असूनही मुख्याध्यापकावर अन्याय होत असून अशाप्रकारच्या पदोन्नतीने कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकाच्या हाताखाली कमी दिवसच काम करायचे आहे, पदोन्नतीनंतर अधिकारी बनत असल्याची भावना कर्मचाऱ्यांची असल्याने मुख्याध्यापकाला आश्रमशाळेत हातखालच्या कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आश्रम शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक कोणत्याही प्रकारची पदोन्नतीची संधी नसल्याने व आश्रम शाळेत हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पदावर बढती होत जावून पुढे तेच अधिकारी त्याच आश्रमशाळेवर अधिकारी म्हणून तपासणीसाठी येतात. अशावेळी पारदर्शक तपासणी होऊ शकत नसल्याचे कर्मचारी सांगतात.
तपासणीसाठी आलेले अधिकारी पूर्वी हाताखली काम केलेले कर्मचारी असल्याने पदोन्नती होत नसल्याचे शल्य मनात राहते. यातून मानसिक त्रास सहन करीत आलेल्या अधिकाऱ्यांना समोर चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनाही पदोन्नतीत सामावून घेण्याची मागणी होत असून याकडे शासनाने लक्ष द्यावे. (वार्ताहर)
राज्यात ७७ ठिकाणी गटशिक्षणाधिकारी आणि २३ ठिकाणी उपशिक्षणाधिकरी म्हणून मुख्याध्यापकांना बढती देण्यात आलेली आहे. याच धर्तीवर आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना बढतीची अपेक्षा आहे. मात्र या विभागात परिस्थिती उलट आहे. आदिवासी विभागांतर्गत चालवल्या जात असलेल्या शासकीय आश्रमशाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून तर माध्यमिक शिक्षकांपर्यंत सर्वांनाच बढती मिळते. मात्र माध्यमिक मुख्याध्यापकांना कोणत्याच निकषावर बढती मिळत नाही. त्यांना नोकरीत रुजू झाल्यापासून तर निवृत्तीपर्यंत मुख्याध्यापक पदावरच रहावे लागते. आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांत पदोन्नतीत दुजाभाव होत असल्याने मुख्याध्यापकांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे. आश्रम शाळेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुख्याध्यापकांनाही पदोन्नती देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.