शिक्षणाधिकाऱ्यांकडून पर्यवेक्षकाच्या वेतनश्रेणीवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:03+5:302021-05-23T04:27:03+5:30
भद्रावती : जिल्ह्यातील एक सहायक शिक्षक पर्यवेक्षक म्हणून उन्नत होताना त्याला नियमानुसार जी वेतनश्रेणी प्राप्त होते, ती नाकारून ...
भद्रावती : जिल्ह्यातील एक सहायक शिक्षक पर्यवेक्षक म्हणून उन्नत होताना त्याला नियमानुसार जी वेतनश्रेणी प्राप्त होते, ती नाकारून शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांनी अन्याय केल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी लक्ष्मण बोढाले यांनी पत्रपरिषदेत केला.
प्रल्हाद गंगाराम पाथोडे हे भिसी येथे जनता विद्यालयात सहायक शिक्षक पदावर पर्यवेक्षक म्हणून उन्नत झाले. तेव्हा त्यांना शासन नियमानुसार सहाव्या वेतन आयोगात ज्या ग्रेड पेवर शिक्षक होता, त्यानुसार सातव्या वेतन आयोगात पर्यवेक्षक म्हणून उन्नत झाल्यास विशेष वेतनश्रेणी देय ठरते. परंतु चंद्रपूर शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक ) ती नाकारली. हा एक प्रकारे संबंधित शिक्षकांवर अन्याय असल्याचे बोढाले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.शिक्षणाधिकारी नरड यांच्या निर्णयाविरुद्ध पाथोडे यांनी उपसंचालक नागपूर यांच्याकडे अपील दाखल केले आहे, परंतु संपूर्ण राज्यात अशा प्रकारे विशेष वेतनश्रेणीचे लाभ शिक्षक घेत असताना नरड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र अमान्य करून काय साध्य केले आहे असे शिक्षक वर्गात बोलले जात आहे.
कोट
मी शासन निर्णयानुसार काम केले आहे. त्या शिक्षकावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्यांनी उपसंचालक कार्यालयात अपील केल्यास तिकडून जो निर्णय घेईल, तो मी मान्य करेल.
-उल्हास नरड,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), चंद्रपूर.