सिंदेवाही तालुक्यात रोहयो मजुरांवर अन्याय
By admin | Published: October 20, 2014 11:09 PM2014-10-20T23:09:30+5:302014-10-20T23:09:30+5:30
रोहयो कायद्यांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने रोपवाटीका तयार करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम करणाऱ्यांना मजुरीच देण्यात आली नाही. तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
चंद्रपूर : रोहयो कायद्यांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने रोपवाटीका तयार करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम करणाऱ्यांना मजुरीच देण्यात आली नाही. तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सिंदेवाही तालुक्यातील मजुरांनी केला आहे.
रोपवाटिकेच्या कामात पिशव्या भरणाऱ्या मजुरांकडून वेठबिगारी करून घेण्यात आली. पेंढरी(कोके) येथील मजुरांना त्याची नुकसान भरपाई मिळताच सिंदेवाही तालुक्यातील अन्यायग्रस्त मजुरांनी याप्रकरणी प्रशासनाकडे न्याय मागितला. मात्र, तहसीलदार व बिडीओ यांनी या प्रकरणाची चौकशी न करता केवळ वेळ मारून नेली. याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक स्मरणपत्रानंतरही चौकश्ी अधिकारी दखल घेत नसल्याने मजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सिंदेवाहीचे तत्कालीन तहसीलदार व बीडीओ यांच्या विरुद्ध जितेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे २९ मे रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे सोपवली. मात्र ही दोन्ही अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यात दिरंगाई केली आहे, असे मजुरांनी म्हटले आहे.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आजपर्यंत तीन वेळा स्मरणपत्रे देवून चौकशी अहवाल सादर करण्याचे कळविले.
मात्र दोन्ही अधिकारी मजुरांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अखिल भारतीय मानवता पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)