अनियमित समायोजन प्रक्रियेमुळे शिक्षकांवर अन्याय
By admin | Published: July 8, 2016 12:53 AM2016-07-08T00:53:53+5:302016-07-08T00:53:53+5:30
पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत शिक्षक समायोजन प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली.
गोंडपिपरी पंचायत समिती : तक्रार दाखल, कारवाईकडे लक्ष
चंद्रपूर : पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत शिक्षक समायोजन प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे सर्वकष चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी निवेदन पाठविले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्याशी शनिवारी चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, गटशिक्षणाधिकारी उराडे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विलास बोबडे, संजय माथनकर, मदन बेत्तावार, बाबुराव मत्ते यांचा समावेश होता.
गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये ३० सप्टेंबर २०१५ अन्वये पटसंख्येनुसार शिक्षक संख्या बरोबर असताना सुद्धा शिक्षकांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे. शासन आदेश १८ मे २०११ नुसार पदविधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी, असे म्हटले आहे. मात्र असे असताना सुद्धा शिक्षकांना समायोजनात अन्य शाळा देण्यात आल्या.
तालुक्यात ३० आॅगस्ट २०१४ पासून तात्पुरत्या नियुक्त्या दिलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३१ मे २०१६ पुर्वी समायोजन बदली प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंधराही पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देऊन शासन आदेश १८ मे २०११ नुसार समायोजन प्रक्रिया राबविण्याचे म्हटले होते. समायोजनात अनियतता आढळल्यास कडक कारवाईचा इशारा संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिला होता.
त्यामुळे पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत झालेल्या समायोजनात अनियमितता झाल्याची तक्रार पंचायत समिती गोंडपिपरी मधील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे रितसर दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे प्रकरण कशाप्रकारे हाताळते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)