वेकोलिच्या कंत्राटी कामगारांवर अन्याय
By admin | Published: April 5, 2017 12:46 AM2017-04-05T00:46:11+5:302017-04-05T00:46:11+5:30
वेकोलिच्या चंद्रपूर व वणी क्षेत्रातील खाजगी कंत्राटी कंपन्याकडून कंत्राटी कामगारांच्या आर्थिक व मानसिक शोषणाच्या निषेधार्थ ....
रायुकाँचे धरणे : काम ज्यादा, पण वेतन अत्यल्प
चंद्रपूर : वेकोलिच्या चंद्रपूर व वणी क्षेत्रातील खाजगी कंत्राटी कंपन्याकडून कंत्राटी कामगारांच्या आर्थिक व मानसिक शोषणाच्या निषेधार्थ तसेच कंत्राटी कामगाराच्या कायदेशीर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, कामगार नेते सय्यद अन्वर, फैय्याद शेख व श्रीनिवास गोसकला यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. वेकोलि प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक खाणीत कोळसा लोडिंग व अनलोडिंग यासह इतर अनेक कामांचे कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंत्राटी कामगारांमार्फत कामे पूर्ण करीत आहेत. परंतु त्यासाठी कंत्राटी कंपन्याकडून नियमांना डावलून इतर कामगारांप्रमाणे ट्रकचालक म्हणून कार्यरत कामगारांकडूनही संपूर्ण महिनाभर विनापगारी सुट्टी न देता तब्बल १२-१२ तास काम करून घेतले जाते. जास्तीचे ट्रीप मारण्याकरिता त्यांच्यावर दबावसुद्धा टाकला जात आहे. तरीही या कामगारांना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दरानुसार वेतन दिले जात नाही.
संबंधित कंत्राटदारांनी वेकोलि अधिकाऱ्यांशी संगनमत करून अशाप्रकारे कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरू केले आहे. मदतनिस (हेल्पर) विना या ट्रक चालकांकडून अतिरिक्त काम घेतले जाते. त्यामुळे ट्रक चालकांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिगडत चालले असल्यामुळे त्यांच्याकडून भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीकडे जिल्हा प्रशासन व वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अन्यायग्रस्त कामगारांना सोबत घेवून आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दुर्गापूर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल ठाकरे, सुनील काळे, सुजीत उपरे, संजय ठाकूर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, किसन अरदळे, दिलीप पिट्टलवार, जयदेव नन्नावरे, करीम शेख, संजय जुनमुलवार, नीतेश दुर्गे, अविनाश जेनेकर, पवन बंडीवार, राजू तुरकर, संजय रायपुरे, भोजू शर्मा, नितीन रत्नपारखी, धनंजय लोखंडे, शैलेद्र बेलसरे आदी आणि कंत्राटी कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)