वनकर्मचाऱ्यांचे पर्यटकांशी असभ्य वर्तन
By admin | Published: June 9, 2017 12:56 AM2017-06-09T00:56:47+5:302017-06-09T00:56:47+5:30
चिमूर तालुक्यातील बफर वनपरिक्षेत्र कार्यालय खडसगी अंतर्गत येणाऱ्या ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पालगतच्या नवेगाव -अलिझंजा येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : चिमूर तालुक्यातील बफर वनपरिक्षेत्र कार्यालय खडसगी अंतर्गत येणाऱ्या ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पालगतच्या नवेगाव -अलिझंजा येथील प्रवेशद्वारावर उपस्थित वन कर्मचारी हे पर्यटकांसोबत असभ्य वर्तन करीत असल्याचे मंगळवारी घडलेल्या एका प्रकारातून उघडकीस आले आहे.
याशिवाय येथील वनकर्मचारी हे प्रवेश शुल्काव्यतिरिक्त एक हजार रुपये जादा मागत असल्याचे दिसून आले.
मंगळवारी चिमूर येथील गणपत खोबरे, रामदास ठुसे व त्यांचे सहकारी एका खाजगी जिप्सीने या गेटवरून अलिझंजा बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता गेले. गेटवर ६०० रुपये प्रवेश शुल्क आणि खाजगी वाहन शुल्क ६०० रुपये आणि गाईड फी अशी पावती फाडून आत नियमानुसार प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. मात्र तिथे वनकर्मचाऱ्यांनी ६०० रुपये शुल्क आणि एक हजार रुपये अतिरिक्त मागितले. पर्यटकांनी तिथूनच उपसंचालक बफर चंद्रपूर यांना याबाबत माहिती दिली. तेथे उपस्थित गेडाम नामक वनरक्षकाला भ्रमणध्वनी देण्याचा प्रयत्न केला असता त्याने अधिकाऱ्यांशी फोनवर बोलण्यास नकार दिला. वनरक्षक गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता येथे अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे सांगितले.